Tag Archives: न्हावी

हा शिवाजी खरा नव्हे

सरदार सिद्दी जौहर ! याने शिवाजी महाराजांचा पराभव करुन, त्यांना पकडून आणण्याची प्रतिज्ञा विजापूरच्या आदिलशहापुढे केली. त्याप्रमाणे प्रचंड फ़ौजफ़ाट्यासह तो महाराजांचा मुक्काम असलेल्या पन्हाळगडावर चालून गेला व त्याने त्या गडाला पक्का वेढा दिला.

तीन महिने झाले, तरी गडाभोवतीच्या वेढ्याचा पोळ कमी होईना. गडावरील दाणा गोटा तर संपत आला. ‘आता काय करायचं ?’ हा प्रश्न गडातील सर्वांपुढे उभा राहिला. मग महाराजांनी शरणागतीचा पांढरा बावटा हाती घेऊन आपला वकील गंगाधरपंत याला सिद्दी जौहरकडे पाठविले व कळविले, ‘आपल्यासारख्या शूर सरदारापुढे आम्ही केव्हाच शरणागती पत्कारायला हवी होती, पण ती न पत्करण्याची चूक आम्ही केली. तेव्हा आमच्या सुरक्षिततेची जर तुम्ही हमी देत असाल तर उद्या रात्री निवडक सोबत्यांसह आम्ही तुमच्याकडे नि:शस्त्र व रुमालात हात बांधलेल्या स्थितीत हजर होऊ आणि तुमच्याबरोबर विजापूर दरबारी येऊन यापुढलं आयुष्य त्यांची सेवा करण्यात घालवू.’

महाराजांच्या आलेल्या लिफ़ाफ़्यातील हा मजकूर वाचून, सिद्दी जौहरला अत्यानंद झाला. त्याने ‘शिवाजी राजांना आम्ही कोणत्याही तऱ्हेचा त्रास होऊ देणार नाही’ अशी तोंडभर हमी दिली. कपटी जौहरची ही वरदेखली हमी घेऊन, महाराजांचा वकील गंगाधरपंथ पुन्हा पन्हाळगडावर गेला.

‘शिवाजी उद्या रात्री आपल्या स्वाधीन होणार,’ या कल्पनेनं सिद्दी जौहरच्या सैन्यात आनंदाला नुसतं उधाण आलं. सैन्यात नाच-गाणं व खाणं-पिणं यांना ऊत येऊन, वेढा काहीसा बेसावध झाला. त्याचा फ़ायदा शिवाजी महाराजांनी घेतला. महाराजांच्या विश्वासातले सरदार बाजीप्रभू देशपांडे यांच्याबरोबर त्याच रात्री ६०० निवडक मावळे काही घोड्यांवरुन तर काही पायी पन्हाळगडातून चूपचाप बाहेर पडले. स्वत: महाराजांनी एका मावळ्याचा वेष केला होता, तर त्यांच्याच चेहरेपट्टीचा शिवा न्हावी हा महाराजांचा पोषाख घालून व हुबेहूब शिवाजी बनून पालखीत बसला होता. सर्व मावळे त्या पालखीसह त्या रात्रीच्या अंधारातून त्या वेढ्याबाहेर पडले व वेगाने विशाळगडाचा मार्ग कापू लागले.

तेवढ्यात सिद्दी जौहरच्या-रानात दडून बसलेल्या एका टेहळ्याला शिवाजी महाराज पालखीतून पळून चालल्याची चाहूल लागली. ‘कौन है?’ असं त्यानं दटावून विचारलं, पण मावळ्यांनी जबाब दिला नाही. त्या टेहळ्याने ताबडतोब सिद्दी जौहरकडे जाऊन, शिवाजी पळून जात असल्याची त्याला खबर दिली. जौहरच्या छावणीत ‘शिवाजी भाग गया’ ची एकच आरडाओरड सुरु झाली. सिद्दी जौहरच्या हुकमावरुन त्याचा जावई सिद्दी मसूद याने पंधराशे घोडेस्वारांसह शिवाजी महाराजांचा पाठलाग सुरु केला. दरम्यान तिकडे शिवाजी महाराजांचा वेष धारण केलेल्या शिवा न्हाव्याची पालखी, सोबत पंधरा-वीस मावळे घेऊन विशाळगडाच्या नित्याच्या रस्त्याने जाऊ लागली, तर मावळ्याच्या वेषातील महाराज, बाजीप्रभू व बाकीच्या लढाऊ मावळ्यांची तुकडी रानातल्या आडवाटेनं विशाळगडाकडे जाऊ लागली.

महाराजांच्या पाठलागावर निघालेल्या सिद्दी मसूदने अखेर ‘नकली महाराज’ आत असलेली पालखी पकडून, ती सिद्दी जौहरकडे नेली. शिवाजी सापडला म्हणून शत्रु सैन्य आनंदाने बेहोष झाले. सिद्दी जौहर व ‘महाराज’ तंबूत बसून एकमेकांशी गप्पा मारु लागले. एवढ्यात महाराजांना व त्यांच्या शिवा न्हाव्याला चांगला ओळखणारा जौहरच्या सैन्यातील एक हेर तिथे आला व जौहरला म्हणाला, ‘खानसाहेब, हा खरा शिवाजी नव्हे; हा तर शिवाजीचा शिवा नावाचा न्हावी !’

पुन्हा शत्रु सैन्यात एकच धावपळ व गडबड उडाली. सिद्दी मसूदने तीन हजार सैन्य पुन्हा खऱ्या शिवाजीच्या पाठलागावर निघाले. पण गजापूरच्या खिंडीत बाजीप्रभूंनी त्याला थोपवून धरले आणि महाराज विशाळगडी पोहोचल्याबद्दल तीन संकेत-तोफ़ा कडाडताच बाजी धारातीर्थी पडले !बाजींनी प्राण पणाला लावून शत्रुला खिंडीत थोपवून धरले, आणि खोट्या शिवाजीने -म्हणजे शिवा न्हाव्याने प्राण पणाला लावून शत्रुला त्याच्या छावणीत काही काळ झुलवीत ठेवले, म्हणूनच खरे शिवाजी महाराज व हिंदवी स्वराज्य यांच्यावरील एक प्राणसंकट दूर झाले.