Tag Archives: पुणे

माय माझी

माय माझी

माय माझी

आईबद्दलच्या भावना तश्या शब्दांत व्यक्त करणं कठीणच. अनेक कर्तुत्ववान व्यक्तींच्या यशात त्यांच्या आईचा वाटा असतो. मुलाला योग्य दिशा, संस्कार देण्याचं काम आईच करते, कारण जीवनाच्या या शाळेत आईच हा पहिला गुरू असते.

अशाच आईच्या संस्काराखाली घडलेल्या कर्तबगार व्यक्तींच्या आईचीं तैलचित्रे प्रसिध्द चित्रकार जगदीश चाफेकर यांनी साकरली आहेत. ‘माय माझी’ या चित्रमालिकेत त्यांनी अशी २९ तैलचित्रे तयार केली आहेत.

पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयातून कमर्शियल आर्टची(उपयोजीत कला) पदवी जगदीश चाफेकर यांनी घेतली आहे. पण चाफेकर व्यवसायिक दुनियेत कधीच रमले नाहीत. त्यांनी सुरवातीला पेन्सिलने काढलेल्या व्यक्तीचित्रांना अनेकांची दाद मिळाली. त्यांच्या कलेला योग्य दिशा मिळाली ती कॅमलीन कंपनीच्या रजनी दांडेकर यांच्यामुळे. त्यांनी चाफेकर यांना पोर्ट्रेट काढण्याचे सुचवले. या नंतर चाफेकर यांनी महाराष्ट्रातील उद्योजकांची चित्रे काढली. शंतनुराव किर्लोस्कर, धीरुभाई अबांनी, बी.जी शिर्के, आप्पासाहेब गरवारे या उद्योगपतींच्या चित्रांचा समावेश होता. विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांच्या पोर्ट्रेट्स चाही यात समावेश होता. अरूणा भट, सोनाली कुलकर्णी, स्मिता घैसास, शोभा भोपटकर, हेमंती कुलकर्णी, साधना सरगम अशा ३७ महिलांची चित्रे त्यांनी रेखाटली. यातूनच ‘माय माझी’ ही कल्पना त्यांना सुचली. या चित्रमालिकेत त्यांनी ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, संगणकतज्ञ विजय भटकर, विठठल कामत अशा मान्यवरांच्या मातांची चित्रे चाफेकरांनी काढली आहेत. याच मालिकेच्या दुसऱ्या भागात अभिनेते रमेश देव, सीमा देव, आयबीएमचे भूषण पटर्वधन अशा २९ कर्तबगार व्यक्तींना घडवणाऱ्या आईची चित्रे रेखाटण्याचे त्यांनी ठरवले आहे. त्यापैकीं २८ चित्रे तयारही झाली आहेत.

आज समाजात वाईट घटनांचे प्रमाण वाढले आहे. कर्तुत्ववान व्यक्तींचा आदर्श अनेकांना दिशादर्शक ठरू शकतो या उद्देशानेच चाफेकर यांनी ही चित्रमालिका केली. जोडीला या कर्तबगार व्यक्तींनी आपल्या आई विषयी सांगितलेल्या भावना त्यांनी पुस्तक रुपाने शब्दबद्ध केल्या आहेत. माय माझी या चित्रमालिकेतील चित्र आणि पुस्तक यांचा मेळ नव्या पिढीला नक्कीच आदर्श ठरेल.