Tag Archives: पेन

मी मुका व बहिरा आहे ग

आगगाडीच्या पहिल्या डब्यातून एक मध्यम वयाचा माणूस प्रवास करीत होता. त्या सबंध डब्यात तो एकटाच होता. एका स्टेशनावर गाडी उभी राहिली असता, झकपक पोषाखातली एक तरुण बाई त्या डब्यात शिरली व त्या गृहस्थाच्या समोरच्या जागेवर जाऊन बसली. त्या गृहस्थाने फ़क्त एकदाच तिच्याकडे पाहिले व काही एक न बोलता, हाती असलेल्या पुस्तकात डोके खुपसले.

गाडी सुरु होऊन तिनं स्टेशन सोडल्याला दोनतीन मिनिटं झाली असतील नसतील, तोच ती तरुणी त्या गृहस्थासमोर उभी राहून त्याला म्हणाली, ‘ तुझ्याजवळ असतील नसतील ते पैसे व बोटातली अंगठी तू मला निमूटपणे दे, नाहीतर साखळी खेचून गाडी थाबंवीन आणि तू माझा हात पकडून माझी अब्रु घेण्याचा प्रयत्न केलास, असा डांगोरा पिटून, मी तुला रेल्वे पोलिसांच्या हवाली करीन.’

त्या तरुणीनं त्याला याप्रमाणे तंबी देताच, त्यानं ‘आपण पूर्णपणे मुके व बहिरे असल्यामुळे आपल्याला जे काही सांगायच असेल, ते कागदावर लिहून दे.’ असं तिला खुणा व हातवारे करुन सांगितले आणि आपल्या खिशातला कागद व पेन काढून तुच्या हाती दिले.कागद व पेन मिळताच त्या तरुणीनं तिची मागणी त्या कागदावर लिहिली आणि तो कागद त्या गृहस्थाच्या हाती दिला.

तो कागद हाती येताच तो गृहस्थ त्या तरुणीला स्वच्छ वाणीनं म्हणाला, ‘मी मुकाही नाही आणि बहीराही नाही. तुझ्या डाकूगिरीचा लेखी पुरावा हाती येण्यासाठी मी ते सोंग आणलं होत. आता तुझ्या हस्ताक्षरातला लेखी पुरावा माझ्या हाती असल्यामुळं मीच गाडीची साखळी खेचतो व तुला रेल्वे पोलीसांच्या स्वाधीन करतो.’ याप्रमाणे बोलून त्याने साखळी खेचून गाडी थांबविली व त्याच वेळी सुदैवाने गाडीतून प्रवास करणाऱ्या रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन तिला केली.