Tag Archives: पोटदुखी

पोटदुख्याला प्रतिशह

मिथीलेचा चतुर रहिवासी गोनू झा, यानं एकदा आपल्या राजावर एक सुंदर कविता केली. राजाला ती कवीता एवढी आवडली की त्यानं गोनूला भर दरबारात बोलावून व त्याला एक हजार सुवर्ण मोहोरा देऊन, त्याचा गौरव केला. या घटनेमुळे, दरबारात असलेल्या विकाटक नावाच्या कवीच्या पोटात दुखु लागलं, त्यानं ‘गोनू झा हा राजाच्या मनातून कसा उतरेल,’ याबद्दल विचार सुरु केला.

राजानं दिलेली १००० मोहोरांची थैली घेऊन गोनू घरी चालला असता, त्याच्या पाठोपाठ तो कवीही चालू लागला, योगायोग असा की, रस्त्यान जाताना गोनूला एक धुळीत पडलेली एक मोहोर दिसली; त्याने नि:शंकपणे उचलून खिशात टाकली; आणि विकाटक कवीला एवढीच गोष्ट राजाचे मन गोणुबद्दल कलुषित करायला पुरेशी वाटली.

कवी विकाटक दुपारी दरबारात जाताच, राजाच्या कानात कुजबुजला, ‘महाराज सकाळी आपण सन्मापूर्वक एक हजार सुवर्ण मोहोरा दिल्या असतानाही गोनूने दरबारातून घरी जाताना, रस्त्यातील धुळीत पडलेली एक मोहोर उचलून ती खिशात घातली ! राजदरबारी मान्यता पावलेल्या माणसानं असं वागणं, म्हणजे अप्रत्यक्षपणे महाराजांनाच कमीपणा आणणं, असं नाही का होत?’

दुसऱ्या दिवशी मिथीलाधीपतीन गोनू झा याला दरबारात बोलावून, ‘काल तू इथून घरी जाताना, रस्त्यातील धुळीत पडलेली एक मोहोर उचलून खिशात टाकलीस ही गोष्ट खरी आहे का?’ असा प्रश्न केला.

ही चहाडी कुणी केली हे हेरुन गोनूनं राजदरबारी मंडळीना उद्देशून मुद्दाम प्रश्न केला, ‘या दरबारात एक कुणीतरी माणूस आहे का, की ज्यानं रस्त्यात पडलेली मोहोर कधी उचलली नाही आणि जो यापुढे ती कधी उचलणार नाही ?’

गोनू झा याच्या प्रश्नाला आपण ‘आम्ही अशी रस्त्यात पडलेली मोहोर कधी उचलली नाही, असं उत्तर दिलं, आणि ते अंगाशी आलं तर?’ असा विचार करुन बाकीची सर्व मंडळी गप्प बसून राहिली; पण गोनू झा याच्य वाईटावर टपलेला कवी विकाटक पटकन उभा राहिला आणि अभिमानानं म्हणाला, ‘मी आजवर अनेक वेळा रस्त्यावर पडलेल्या मोहोरा पाहिल्या आहेत; पण मी त्या कधी उचलल्या तर नाहीतच उलट मी त्यांना पायांनी तुडवून पुढं गेलो आहे. माझ्या या वृत्तीत पुढंही फ़रक पडणार नाही.’

विकाटक याप्रमाणे म्हणताच, राजाला उद्देशून गोनू म्हणाला, ‘महाराज, या विकाटक कवीच्यात आणि माझ्यात हाच फ़रक आहे. तसं पाहता, माझ्या घरची परिस्थिती मोहोरा दिल्या होत्या. अशा स्थितीत रस्त्यात पडलेली ती मोहोरा उचलण्याचा मोह मला कसा होईल ? पण त्या मोहोरेवर ‘राजमुद्रा’ म्हणजे आपल्या छबीचा छाप होता. अशी ती आपला ‘छाप’ असलेली मोहोर दृष्टीस पडली असतानाही तशीच रस्त्यावर पडू देणं म्हणजे रस्त्यानं जाणाऱ्या अन्य पदातीच्या पायांखाली ती तुडवली जावी यासाठी तिला तिथं ठेवणं, असं झालं असतं. तेव्हा राजमुद्रांकित मोहोर रस्त्यावर पडू द्यायला किंवा तिला जाणूनबूजून तुडवायला, मी काही या विकाटकासारखा राजद्रोही थोडाच आहे? मुळीच नाही; आणि म्हणूनच ती रस्त्यातल्या धुळीत पडलेली मोहोर उचलून खिशात टाकण्यात मला काहीच वावगं वाटलं नाही.’

गोनू झा याच्या स्पष्टीकरणामुळे त्याच्यावर प्रसन्न झालेल्या राजाने त्याला आणखी एक हजार मोहोरा देऊन त्याच्या राजनिष्ठेचे कौतुक केले, तर विकाटकाचा राजाश्रय काढून घेऊन, त्याला हाकलून दिले.