Tag Archives: माहीम

मुंबई उपनगर जिल्हा

मोठा कुलाबा, धाकटा कुलाबा, मुंबई, माझागाव, परळ, वरळी व माहीम ही सात बेटे एकमेकांना जोडून मुंबई बेट तयार केले गेले साहजिकच, शहराचे क्षेत्रफळ मर्यादित होते. ब्रिटिश राजवटीत सुरुवातीस ‘मुंबई शहर’ हा एकच जिल्हा होता. शहराचे भौगोलिक व राजकीय स्थान लक्षात घेता स्वाभाविकतःच व शहाराची वाढ वेगाने होत गेली. शहरात वस्तीसाठी जागा अपुरी पडू लगल्यामुळे शेजारच्या साष्टी बेटावर या वाढत्या लोकसंख्येने आक्रमण व मुंबईची उपनगरे अस्तित्वात आली. ब्रिटिश राजवटीत १९२० च्या दरम्यान या उपनगरांना स्वतंत्र जिल्ह्याचे स्थान दिले गेले.

दरम्यानच्या काळात शहराचा विकास व महत्त्व आणि त्याबरोबर लोकसंख्या वाढत गेली. क्रमाक्रमाने खार, सांताक्रुझ, विलेपार्ले व अंधेरी येथे वसाहती उभ्या राहिल्या. गोरेगाव, मालाड येथील खाड्यांच्या परिसरात वस्ती वाढली. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव हे परिसर औद्योगिकदृष्ट्या विकसित झाले. चेंबूर, घाटकोपर,भांडुप या परिसरातही लोकसंख्या फुगू लागली. मुळातच भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले हे शहर राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, व औद्योगिकदृष्ट्याही महत्त्वाचे बनले. या पार्श्वभूमीवर मुंबई शहराची मर्यादा वाढविली गेली आणि १९५७ मध्ये उपनगर जिल्हा मुंबई शहर जिल्ह्यात विलीन करण्यात आला. या नव्या जिल्ह्याला बृहन्मुंबई जिल्हा’ या नावाने ओळखले जाऊ लागले.

पुढील काळात तर शहराचे सर्वांगीण महत्त्व व लोकसंख्या यात गुणात्मकरित्या वाट घडून आली आणि १९९० मध्ये या नव्या बृहन्मुंबई जिल्ह्याचे पुन्हा विभाजन करण्यात येऊन ‘मुंबई शहर’ व ‘मुंबई उपनगर” हे दोन स्वतंत्र जिल्हे निर्माण केले गेले.