Tag Archives: रत्नागिरी जिल्हा

रत्नागिरी जिल्हा

भारताच्या इतिहासावर आपला ठसा उमटविणाऱ्या, नव्हे भारताचा इतिहासच घडविणाऱ्या अनेक नररत्नांचा हा जिल्हा किंबहुना, अशा नररत्नांची ही खाणच !

या जिल्ह्यातील पोंभुर्ले हे मराठी वृत्तपत्रांचे जनक ‘दर्पण’ कार बाळशास्त्री जांभेकर यांचे जन्मस्थान.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक पर्वच ज्यांच्या नावाने ओळखले जाते; ते हिंदी राष्ट्रवादाचे कट्टर पुरस्कर्ते, हिंदी असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म याच जिल्ह्यातील रत्नागिरीजवळच्या चिखली येथील. स्त्री-शिक्षणासाठी आयुष्यभर स्वतःस वाहून घेणारे स्त्री-शिक्षणाचे व विधवा विवाहाचे कट्टर पुरस्कर्ते महर्शी धो.के. कर्वे याच जिल्ह्यातील शेरवलीचे.  मालगुंड हे मराठीतील युगप्रवर्तक कवी कृष्णाजी केशव दामले-केशवसूत- यांचे जन्मगाव. प्रसिद्ध समाजवादी विचारवंत नारायण गणेश उर्फ नानासाहेब गोरे यांचा जन्मही याच जिल्ह्यातील हिंदळे गावचा.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात धडाडीने सहभाग घेणारे, जगाला मानवधर्म शिकविणारे मातृहृदयचे कवी साने गुरुजी यांचा जन्मही याच जिल्ह्यातील पालगडचा. न्यायमूर्ती गोपाळ कृष्ण गोखले यांचाही जन्म याच जिल्ह्यातील कोतळूक गावचा. रँग्लर पराजंपे, लोकसभेचे पहिले अध्यक्ष ग. वा. मावळंकर, मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळ गंगाधर खेर, सुप्रसिद्ध विनोदी नट शंकर घाणेकर व नटवर्य काशिनाथ घाणेकर ह्या या जिल्ह्यानेच महाराष्ट्राला दिलेल्या देणग्या होत. रत्नागिरीस ‘रत्नभूमी’ म्हणूनच ओळखले जाते.