Tag Archives: वाङ्‍मय

आजकालचे वाङ्‍मय

संत ज्ञानेश्वर

संत ज्ञानेश्वर

मराठी साहित्याचा उगम जणू धुक्यात लपेटलेला आहे. तेराव्या शतकाच्या शेवटच्या दोनतीन दशकांत हे धुके निवळू लागते आणि तेजस्वी साहित्यकृती दृश्यमान होऊ लागतात. ज्ञानेश्वरी (१२९३) ही त्यांच्यातील सर्वात तेजस्वी साहित्यकृती होय. मात्र, ज्ञानेश्वरी ही काही सर्वात प्राचीन रचना नव्हे. अद्वैत तत्वज्ञान विस्तृत पद्यमय स्वरूपात प्रतिपादन करणार मुकुंदराजांचा विवेकसिंधू, महानुभाव पंथांचे संस्थापक चक्रधर यांच्या जीवनातील घटनाप्रसंगाचे कथन करणारा माहिमभट्टाने रचलेला गद्यग्रंथ लीळाचरित्र, विवाहरप्रंसगी गायिलेल्या गाण्यांतून सिद्ध झालेले महानुभवी कवयित्री महदंबा हिचे धवळे यांच्यापैकी एखाद्या रचनेकडे आद्यत्वाचा मान जाऊ शकेल. या रचनांतून दिसणारा ग्रंथकारांचा आत्मविश्वास आणि प्रगल्भपणा असे सुचवतात की या आधीसुद्धा काही ग्रंथरचना झाली असली पाहिजे. या दिशेने शोध घेताना काही प्रयत्नांचा मागोवा लागतो. उदाहरणार्थ, हालाराजाची गाथासप्तशती (तिसरे शतक). दोन दोन चरणांच्या सुमारे हजारभर कवितांच्या या गाथेत महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसांच्या जगण्याचे जिवंत दर्शन घडते. मराठीची निकटची पूर्वभाषा असलेल्या महाराष्ट्री प्राकृत भाषेत गाथासप्तशती रचलेली आहे. आपण असे अनुमान करू शकतो की येथील लोकांच्या आत्माविष्कांराच्या प्रेरणेत सातत्य असले पाहिजे, आणि त्यामुळे मराठी भाषेच्या आरंभीच्या दीर्घ आणि अप्रकाशित कालखंडातही साहित्यरचनेचे काही प्रयत्न निश्चितच झाले असले पाहिजेत.

“लाखो लोकांच्या दृष्टीने ज्ञानेश्वरी ही मराठी भाषेतील सर्वश्रेष्ठ अभिजात साहित्यकृती आहे” बौद्धिक आणि आध्यात्मिक असे दुहेरी स्वरूप असणाऱ्या ज्ञानेश्वरी पासूनच चारशे वर्षांच्या उज्ज्वल संतकविता परंपरेचा आरंभ होतो. संतत्व आणि मनुष्यत्व लौकिक आणि पारलौकिक यांचा बव्हंशी समन्वय साधणाऱ्या संतकवितेत पुष्कळ विविधता आहे; आणि ती कोणत्याही संकुचित संप्रदायाशी जखडलेली नाही. या समन्वयाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे संत तुकारामाचे (१६०८ ते१६५०) अभंग. त्यांच्यांत एकाच वेळी, साक्षात्कारी अनुभवाची उत्कटता, अन्याय आणि ढोंगीपणाचा औपरोधिक उच्छेद आढळून येतात. महाराष्ट्रातील हा भक्ती-पंथ म्हणजे त्या काळी सर्व देशभर अवतरलेल्या भक्तीभावनेचे एक संघटित रूप होते. या भागवत-पंथाची काही खास वैशिष्ट्ये होती : त्यात व्यक्तिगत मोक्षाला स्थान नव्हते. हा पंथ खऱ्या अर्थाने विशाल दृष्टीचा आणि सहिष्णू होता. धर्म आणि जातीभेदांना पंथात स्थान नव्हते. ब्राह्मणांपासून शूद्रांपर्यंत आणि अगदी मुस्लिमापर्यंत समाजातील सर्व वर्गांचे प्रतिनिधी या पंथात आढळतात. या आध्यात्मिक लोकशाहीतून सामाजिक लोकशाहीचे प्रवर्तन झाले नाही हे खरे; तरीसुद्धा सामाजिक जीवनाच्या काही क्षेत्रांत तिचा थोडाबहुत शिरकाव झाला असला पाहिजे.

सतराव्या आणि अठराव्या शतकांत उत्कर्षाला पोहोचल्या पंडिती काव्याचे येथील समाजजीवनाशी काही अर्थपूर्ण नातेच नव्हते. पंडिती काव्याला आधार होता पुराणांचा, आणि त्यात वृतरचनेच्या आणि अलंकार योजनेच्या इतक्या करामती होत्या की त्यामुळे त्या काव्याचे आवाहन मर्यादित झाले : ते केवळ प्रतिष्टितांच्या करमणुकीचे साधन होऊन बसले. शृंगाररसात्मक लावणी आणि वीररसात्मक पोवाडा हे लोककलाप्रकार जनसामान्यांची करमणूक करत होते. पोवाड्यातील वीररस बहुधा ढोबळ तर लावणीतील शृंगाररस सहसा भडक होता. दोन्ही काव्यप्रकारात एक खुला जोरकसपणा होता; तो बंदिस्त काव्यप्रकारात सामावण्यासारखा नव्हता काव्यातील हा भेद समाजातील भेदाशी समांतर होता या दोघांच्याही आरोग्याला सारखाच बाधक होता. या काळात गद्य एकूण कमीच होते. जे होते ते विशिष्ट मर्यादित हेतूंसाठी लिहिले जात होते. पण त्यामुळे त्यात साहित्यिक डौलीपणा नव्हता. त्यातील सर्वोत्कृष्ट गद्य, बखरीत आणि दरबारी पत्रव्यवहारात हरवून गेले आहे.

आधुनिकतेला पुनर्जीवन आणि सद्यःकालीन मराठी साहित्य