Tag Archives: विश्वकर्मप्रकाश

हिंदू घर

घर शब्द उच्चारताच आठवल्या एका प्रसिद्ध कवितेच्या दोन पंक्ती :

घर असावे घरासारखे,
नकोत नुसत्या भिंती ॥

नुसत्या भिंती नकोत, म्हणजे भिंती तर असाव्यातच, पण अधिक काहीतरी असावे, भिंतीची आवश्यकता का ? तर ऊन, वारा, पाऊस, थंडी यांपासून संरक्षण मिळावे. हक्काचा निवारा असावा, सुरक्षितता असावी. म्हणून मानवाने प्राचीन काळापासूनच असा प्रयत्न केलेला आढळतो. झाडाच्या खोडात असलेली ढोल, एखादी डोंगरातील गुहा, फांद्या काटक्यांनी बांधलेली झोपडी, दगडांचे घर, विटांचे बांधकाम व आता सिमेंट क्रॉंक्रीटचे घर, असा बदल होत गेला असेल. पण मुळात कल्पना तीच.
असा निवारा आवश्यक आहे हे जाणवल्यानंतर त्यावर अधिकाधिक विचार केला गेल. अन एक वास्तुकलाच निर्माण झाली. पुढे त्याचे वास्तुशास्त्र बनले. त्यात प्रामुख्याने जमीन, भिंती, दारे, खिडक्या इत्यादींचा विचार केला जात असला, तरी त्यातील मूलभूत जो विचार आहे तो त्या घरात राहणाऱ्या लोकांना सुख लाभावे हा ! सृष्टीतील निसर्गनिर्मित वस्तू घेऊन आणि त्यावर संस्कार करून निवारा तयार करावा. पण निसर्गातील चल-अचल, जड-चेतन, दृश्य-अदृश्य असे जे सर्व घटक आहेत त्यांनी परस्परावलंबिता, त्यांचे परस्परांतील संबंध ध्यानात घेऊन त्याला आपल्या या कृत्रिम निर्मितीने बाधा येणार नाही, हा विचार वास्तुशास्त्रात झाला.

निवारा ही माणसाची प्राथमिक गरज असल्याने वास्तुशास्त्राची प्रगती झपाट्याने झाली. आपल्या जगाच्या इतिहासात भारताबरोबरच इतर काही संस्कृती विकास पावल्या. पण त्या अल्पजीवी ठरल्या. त्यामुळे या विषयावरही भारतातच अधिक ग्रंथनिर्मिती झाल्याने आढळते. विश्वकर्मीय शिल्प, मानसार वास्तुशास्त्र, विश्वकर्मप्रकाश आदी वास्तुकला ग्रंथाबरोबरच बृहत्संहिता, स्कंदपुराण, अग्निपुराण, गरुडपुराण, तंत्रग्रंथ यांतही या संबंधीचे विवेचन आहे.

पंचमहाभूतांपासून बनलेल्या या चराचर सृष्टीत मानवाचे शरीरही पंचमहाभूतांपासूनच बनलेले असल्याचे वास्तुरचनेतही या पंचमहाभूतांचा विचार केला गेला. चराचर सृष्टी, मानवी शरीर व वास्तू यांच्यात समतोल व सुसंवाद साधला साधला जाईल, अशी वास्तुरचना विचारपूर्वक आखली गेली. सूर्यप्रकाश, वाऱ्यांची दिशा, जमिनीचा उतार, घरासाठी उपलब्ध होणारे क्षेत्र, मातीचा प्रकार, पृथ्वीचे चुंबकत्व, गुरुत्वाकर्षण आदी सर्व गोष्टींचा विचार करून प्रयोगांती निष्कर्ष काढले गेले.

यात सोय, सुरक्षितता, स्वच्छता यांचाही विचार झाला. मुख्य वास्तूत एकदम प्रवेश नसावा हे स्वच्छतेच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असल्याने कुंपणभिंतीपासून मुख्य इमारतआत असावी, आधी ओटी असावी. मगच दिवाणखान्यात प्रवेश व्हावा. स्वयंपाकघर स्वतंत्र असावे. शक्यतो स्वयंपाकघर व जेवणघर एकच असावे. ईशान्य दिशेला स्वतंत्र देवघर असावे, आग्नेयेकडे चूल असावी, बाळंतिणीची खोली स्वतंत्र असावी. संडास लांब असावेत. सांडपाण्याच्या नाल्या झाकलेल्या असव्यात वगैरे गोष्टी ठरविल्या गेल्या.

यात पर्यावरणाच्या विचारही झाला. स्वावलंबी जीवनासाठी भाजीपाला, फळझाडे, फुलझाडे, औषधी वनस्पती लावण्यासाठी परसदारी मोकळी जागा असावी. पूर्वेकडे कमी उंचीची झाडे लावावीत. तुळशी वृंदावन असावेच. केळी, आळू, तोंडली यांसारखी सतत पाणी लागणारी झाडे स्नानगृहाचे पाणी जात असेल, तेथे लावावीत वगैर माहिती सांगितली गेली.

वास्तूची नुसती निर्जीव निर्मिती नव्हे तर तिच्यावर तांत्रिक संस्काररांबरोबरच आध्यात्मिक संस्कार केल्यानंतरच तिला खरे ‘ घरपण ’ प्राप्त होते व तिच्यापासून शुभफळे मिळतात. असा भारतीयांचा विश्वास आहे. म्हणून वास्तुशांतीची प्रथा सुरू झाली. प्रत्येक वास्तूमध्ये एक अदृश्य शक्तीचा वास असतो. तिचा बरावाईट प्रभाव त्या घरात राहणाऱ्यावर पडत असतो; याचा अनुभव आपण घेतोच. काही ठिकाणी प्रसन्न वाटते तर काही ठिकाणी मनात उगाचच भय निर्माण होते. हे भावनिक असते असे म्हणता येणार नाही. एखाद्या वास्तूत प्रवेश केल्याबरोबर वाढलेला श्वसनाचा वेग मोजताही येऊ शकतो. अशी वास्तू सदोष समजतात. दक्षिणेकडे पाय करून झोपल्यास रक्ताभिसरण परिणाम होतो. हृदयाची स्पंदने अनियमित होतात. छातीत धडधडते, याचा अनुभव अनेकांना आलेला आहे. अर्थातच झोपण्याच्या खोलीची रचना याचा विचार करून बनावी लागते.

ज्या वेळी जागा भरपूर होती – निवडीची संधी मिळत होती, तेव्हाची गोष्टच वेगळी होती, असे आज वाटणे स्वाभाविक आहे. वाढती लोकसंख्या, वाढते उद्योगधंदे, शहरीकरण यामुळे मिळेल त्या जागेवर, बांधता येईल तसे घर हीच कल्पना मुख्यतः आहे. फ्लॅट पद्धतीत तर आपल्य निवडीला काहीच संधी नसते. तरीही आजकाल घराची अंतर्गत रचना करीत असताना वस्तुशास्त्राचा थोडाबहुत विचार करण्याकडे लोकांचा कल वाढू लागला आहे. या घराच्या भिंती आपल्या हातात नसल्याने अंतर्गत सुभोभनच फक्त मनासारखे करता येते. पण त्यातही फारशी संधी मिळतेच असे नाही. कारण लहान जागा – सर्वांच्या सारख्याच आवश्यकता. त्यामुळे पुष्कळदा तोचतोपणा दिसतो. अन तरीही घराच्या दर्शनाने घरातील माणसांच्या स्वभावाचा, त्यांच्या आर्थिक स्थितीचा, घरातील सर्वांच्या व्यवस्थितपणाचा, त्यांच्यावरील संस्कारांचा अंदाज येतोच. म्हणून हिंदुस्थानातील अधिकाधिक घर ‘ हिंदू ’ दिसावीत व असावीत यासाठी ‘ हिंदू घर ’ संकल्पना मांडावी लागते. कारण घराच्या रचनेचा, घरातील सुशोभनाचा देखील संस्कार मनावर होत असतो. याचाच अर्थ असा की, जिथे ‘ घर ’ संकल्पनेतील ‘ नुसत्या भिंती ’चा देखील शास्त्रशुद्ध विचार करावा लागतो तिथे घरातील व्यवस्था व घरातील माणसे यांचा विचार तर अधिक आस्थापूर्वक करायला हवा.