Tag Archives: संत तुकाराम महाराज

पंढरपूरा नेईन गुढी

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा

भक्तजन भागवत धर्माच्या पताका घेऊन ‘माझी जीविची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी’ या भावनेने रविवारी पंढरीला निघाले. ‘नाचत जाऊ त्याच्या गावा रे खेळिया, सुख देईल विसावा रे, गात जा गा गात जा गा, प्रेम मागा विठ्ठली’ हा एकच ध्यास त्यांच्या मुखी दिसत आहे.

दुपारी चारच्या सुमारास जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीने गरुड, टक्के, दिंडी, कुंचे पतालांचे भार घेऊन आलेल्या वैष्णवांच्या साक्षीत पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. ‘धन्य देहूगाव, पुण्यभूमी ठाव, तेथे नांदे देव, पांडुरंग’ ही प्रचिती त्यावेळी उपस्थितांना आली. राज्याच्या कानाकोपर्‍यातून भाविकांनी हा अनुपम्य सोहळा डोळ्यात साठविण्यासाठी गर्दी केली होती. त्यांच्या मनात सावळ्या विठ्ठलाचे रुप होते व मुखी विठ्ठल आणि तुकोबारायांच्या नावाचा गजर.

पहाटे साडेचार वाजता शिळामंदिराच्या महामूजेने आणि महाभिषेकाने परंपरेनुसार पालखी प्रस्थान सोहळ्याचा प्रारंभ झाला. त्यानंतर साडेपाच वाजता संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष शिवाजी मोरे आणि विश्वस्तांच्या उपस्थितीत मुख्य मंदिरातील विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीची पूजा झाली. पादुकांची पूजा महाराजांचे वंशज दिलीप गोसावी यांनी इनामदार वाड्यात केली. टाळ, मृदुंगाच्या गजरात सुरेश म्हसलेकर यांनी चांदीच्या पादुका डोक्यावर घेऊन मुख्य मंदित्रातील भजनी मंडापात आणल्या. दिंड्यांचे आगमन या कालावधीत गावात झाले. त्यापूर्वी कान्होबा महाराज यांचे काल्याचे कीर्तन मुख्य मंदिरात झाले.

राज्याचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भजनी मंडपात सपत्निक पूजा केली. पायी दिंडीतील पिराची कुरोली येथील जनार्दन लांबकाने (८५) यांना त्यांच्यासमवेत पूजेचा मान मिळाला. महापौर मोहिनी मांडे, खासदार गजानन बाबर, आमदार विलास लांडे, बाळा भेगडे, अनिल भोसले, सरपंच कांतीलाल काळोखे, अकलूजचे जयसिंगराव मोहिते-पाटील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे विश्वस्त डॉ. प्रशांत सुरु, श्यामदार मुळे या वेळी उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उगम आणि विकास पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन झाले. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी आश्वासन दिले की, जरी दुष्काळाचे सावट दिसत असले तरी या पालखी सोहळ्याला पाणी टंचाई जाणवू देनार नाही.

या कार्यक्रमानंतर प्रदक्षिणेसाठी चारच्या सुमारास पालखी भजनी मंडपातून बाहेर आली. ‘पुंडलिक वरदे हरि विठ्ठल’ या नामाचा मंदिरात जोरदार गजर झाला. भक्तीचा अलौकीक रंग यावेळेस दिसत होता.