Tag Archives: संशोधक

ग्रामीण संशोधकाची सर्जा गाडी

प्रत्येक व्यक्तींच्या जीवनात अनेक अडचणी व प्रतिकुल परिस्थिती येतच असते. यातील काही जण अडचणी आल्या म्हणून शांत बसतात व स्वतःलाच दोष देतात. काही जण त्या अडचणीवर पर्याय शोधतात तर काही जण त्या अडचणीवर मात करून आपला मार्ग सुकर करतात अशा या तिसऱ्या पर्कारातील व्यक्तींमध्ये जळगाव जिल्ह्यातील श्रीक्षेत्र पिंगळवाडे ता. अमळनेर येथील विकास चैत्राम शिंदे या तरुण धडपड्या ग्रामीण संशोधकाचा समावेश होतो.

दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्यावेळी ब्रिटनेचे पंतप्रधान असलेले विन्स्टन चर्चिल नेहमी म्हणत “निराशावादी लोकांना प्रत्येक संधीत अडचणी दिसतात तर आशावादी माणसे प्रत्येक अडचणीत संधी शोधतात” हे वाक्य अगदी समर्पकपणे विकास शिंदे यांना लागू पडत असल्याचे जाणवले. आपले नाव श्रीक्षेत्र पिंगळवाडे येथील एका गल्लीतून दिल्लीतील कृषी प्रदर्शनात आपण कृषी विकासासाठी केलेले नवनवीन प्रयोग प्रदर्शित करता येतील याबद्दल खुद्द विकास शिंदे यांना देखील पुसटशी कल्पना नव्हती परंतु, विकास शिंदे या ग्रामीण धडपड्या संशोधकाला नवी दिल्ली येथील प्रदर्शनात आपले संशोधन मांडण्याची संधी मिळाली त्यांच्या या कृषी संशोधनाला राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचेसह अनेक मान्यवरांनी भेट देऊन कौतुक केले.

एका मागासलेल्या व जेमतेम लोकवस्तीच्या पिंगळवडे गावातील जुजबी शिक्षण घेतलेल्या विकास शिंदे या शेतकऱ्याची संशोधनाकडे वळण्याची कथा साधी असती तरी पुढील रोमांचकारी संशोधनाला साद घालण्यासाठी उपयुक्तच ठरली. विकास शिंदे यांचा स्वभाव मुळातच उद्योगी व जिज्ञासू असल्याने ते घरी विविध प्रयोग करत असत. त्यांच्या गावात सायकलचे पंक्चर काढण्याचे दुकान नव्हते त्यामुळे शिंदे यांनी स्वतःच्या सायकलचे पंक्चर स्वतः यशस्वीपणे काढले. त्यांच्या या प्रयोगाची चर्चा छोट्याशा पिंगळवाडे गावात खुमासदारपणे चर्चिली गेली त्यातून त्यांच्या धडपड्या स्वभावाला खतपाणी घातले जाऊन त्यांना नवनवीन प्रयोग करण्याची उर्मी जडली.

सायकलचे पंक्चर ते “सर्जा” शेतगाडीची निर्मिती
सायकल पंक्चर काढण्याच्या व्यवसायातून त्यांना प्रतिदिन सुमारे शंभर रुपये मिळाले त्या मिळकतीतून त्यांनी काही बचत करुन थोड्याच दिवसात मोटार सायकल खरेदी केली व हीच मोटार सायकल खऱ्या अर्थाने त्यांच्यातील संशोधक वृत्तीला प्रेरणा देणारी ठरली. या मोटार सायकलचा वापर करून त्यांनी शेतीची कामे कमी वेळात व कमी श्रमात होण्यासाठी अनेक प्रयोग केले त्यांच्या या प्रयोगाला यशही प्राप्त होत गेले. त्यामुळे त्यांचे नाव गावपातळीवरून राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचले. त्यांनी तयार केलेली बहुउदेशीय “शेतगाडी” ही तर जळगाव जिल्ह्यासह राष्ट्रीय पातळीवर चर्चेचा व कौतुकाचा विषय ठरली आहे. शेतकरी बैलजोडीचा वापर करून शेतीतील नांगरणी कोळपणी, तण काढणे पेरणी आदी कामे पार पाडतो त्याचप्रमाणे ही गाडी कामे करत असल्याने या गाडीचे शिंदे यांनी “सर्जा” गाडी असे नामकरणही केले आहे.

या “सर्जा” गाडीने खान्देश महोत्सव दिल्लीतील कृषी प्रदर्शनाबरोबर दिनांक ६ ते ९ जानेवारी रोजी संपन्न झालेल्या बेगंलोर येथील दुसऱ्या आंतरराष्ट्रीय अ‍ॅटो शोमध्ये ही मोठी लोकप्रियता मिळविली आहे.

बहुउद्देशीय शेतगाडीचा उपयोग
शेतातील गवत कापणे, नागरणी करणे आणि शेतात विशिष्ट जागी मार्किंग करणे यासाठी होतो. या गाडीचा उपयोग करुनएक लिटर पेट्रोलमध्ये एक एकर जमीन नांगरली जाते त्यामुळे कमी पैशात व कमी श्रमात जमीन नांगरली जाऊन शेतकऱ्यांची वेळेतही बचत होते. ही गाडी दिवसाला दोन एकर जमीन नांगरते एवढीच जमीन नागरण्यासाठी दिवसाला बैलजोडी वापरल्यास सहाशेपेक्षा अधिक खर्च येतो.

वेल्डींग शॉपमुळे संशोधनाला गती
अशा धडपड्या उद्योगी स्वभावाच्या माणसाचे एक खास वैशिष्ट असते ते म्हणजे सभोवताली घडणाऱ्या घटनांचे अवलोकन करुन समोर येणाऱ्या नवनवीन आव्हानांचा मुकबला ते करतात. शिंदे यांना वेल्डींग शॉप सुरु करायचे होते कारण त्यांच्या पुढील संशोधनाला हे वेल्डींग शॉप फार उपयोगी ठरणार होते. त्यासाठी त्यांनी बकऱ्या विकून वेल्डींग शॉप थाटले व गावातील आयटीआय झालेल्या विद्यार्थ्यांकडून वेल्डींगचे प्रशिक्षण घेतले.

वेल्डींग शॉप थाटले, मशीन चालविण्याचे ज्ञान आत्मसात केले त्यानंतर शिंदे यांच्या धडपड्या मनाने शेतातील दैनदिन कामे कमी वेळात, श्रमात आणि जलदगतीने व्हावी यासाठी नवनवीन प्रयोगाचा मार्ग अनुसरला. त्यांच्या या प्रयोगातून पंचक्रोशीत शेतकऱ्यांना आपल्या शेतातील कामे कमी खर्चात, कमी वेळात व तीव्रगतीने होण्यास मदत होत आहे आणि हेच शिंदे यांच्या संशोधनाचे खरं यश आहे. कारण शिंदे यांनी संशोधित केलेली शेतगाडी, ट्युबवेल मधून पाणी काढणारी मोटार सायकल, पाणी उपसा यंत्र, शेतातील कचरा जमा करण्यासाठी हस्तचलित फावडं आदिंमुळे सामान्य शेतकऱ्यांना फार फायदा होत आहे.

शिंदे यांच्या घरची दीड एकर जमीन तर त्यांच्या मामाची मोठी जमीन बटाई तत्त्वावर कसायाला त्यांनी घेतली. ही सर्व जमीन मनुष्यबळाचा वापर करुन कसणं आर्थिकदृष्ट्या परवडणारे नव्हते. त्यामुळे त्यांनी टी.व्ही. वरील कार्यक्रम पाहून हाताने चालविता येणारे कोळपणी यंत्र तयार केले. या यंत्राच्या सहाय्याने त्यांनी दोन-तीन वर्षे शेती कसली याचवेळी त्यांच्या संशोधक वृत्तीने त्या यंत्राला एम.ए.टी. या स्कूटरचे इंजिन लावून स्वयंचलित केले त्यामुळे कोळपणी, पेरणी आणि कोर पाडण्याची कामे जलद गतीने केली जाऊ लागली.

खान्देश महोत्सव ते दिल्लीतील कृषी प्रदर्शन
२८ ते ३१ जानेवारी, २०१० या कालावधीत जळगाव मध्ये जिल्हा प्रशासनाकडून खान्देश महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवातून स्थानिक कलाकार, संशोधक, साहित्यिक यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते. या व्यासपीठाचा शिंदे यांना फार मोठा फायदा मिळाला. त्यांनी तयार केलेली बहुउद्देशीय शेतगाडी, पाणी उपसा यंत्र याची जळगाव, धुळे व नंदूरबार जिल्ह्यात चर्चा सुरु झाली. या खान्देश महोत्सवात शिंदे यांच्या संशोधक वृतीला चांगली प्रसिद्धी मिळाली व त्यामुळेच अहमदाबाद येथील “एनआयएफ” संस्थेने विकास शिंदे व तांच्या पत्नी प्रमिला शिंदे यांना आर्थिक सहाय्य करुन त्यांच्यातील संशोधक वृत्तीला चालना देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले याच संस्थेच्या सहकार्याने शिंदे त्यांच्या पत्नी हे नवी दिल्ली येथील कृषी प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी दिल्लीला गेले. याकृषी प्रदर्शनात शिंदे यांच्या साध्या, सोप्या परंतू अत्यंत उपयोगी कृषी अवजारांनी सर्वांच्या नजरा आपल्याकडे आकर्षित करुन घेतल्या.

या प्रदर्शनात विकास शिंदे व त्यांच्या क्रुषी अवजारांची/ यंत्राची चर्चा सर्वत्र सुरु झाली त्यांच्या पत्नी प्रमिला शिंदे यांनी ही नर्सरी बागेचा केलेला प्रयोग ही प्रदर्शनात कौतुकास पात्र ठरला. राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील, दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित, तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सॅम पित्रोदा, चित्रपट दिग्दर्शक जेम्स कॅमरून व निर्माते शेखर कपूर आदी मान्यवरांनी या पती-पत्नीची प्रशंसा केली.

शिंदे यांचे संशोधन
विकास शिंदे यांनी आपल्यात असलेल्या संशोधक वृत्तीच्या जोरावर शेतीच्या कामासाठी उपयोगी पडणारी नानाविध अवजारे व यंत्रे तयार केली. ही यंत्रे तयार करत असतांना त्यांना अनेक अडचणी आल्या परंतु त्यांच्या धडपड्या स्वभावाने या सर्वांवर मात करुन शेतीत उपयोगी पडणारी अवजारे यंत्रे त्यांनी निर्माण केली.त्यामध्ये बहुउद्देशीय शेतगाडी, हात, पाय, आणि मोटार सायकलच्या सहाय्याने ट्युबवेलमधून पाणी काढणारे यंत्र, कापूस लागवडीसाठी मार्किंग करणारे यंत्र, शेतातील कचरा जमा करणारा हस्तचलित फावडा, धान्य साफ करणारा टेबल फॅन, बॅटरीच्या सहाय्याने चालणारे फवारणी यंत्र, मोबाईल चार्ज करणारी बॅटरी, मोटार सायकलवर चालणारं ऊस काढणारं यंत्र, पीव्हीसी पाईपच्या तुकड्यांपासून कपलिंग बनविणारं यंत्र, गहू, ज्वारी, मूग, सोयाबीनची पेरणी करणारं यंत्र, एका बैलाच्या सहाय्याने वापरता येणारी शेतातील अनेक अवजार, कापसाची झाडं उपटून एकत्र जमा करून हसतचलित अवजार आणि शेतीतील मालाच्या वाहतुकीसाठी पेट्रोलवर चालणारी एक शंभर सीसीची चार मोठ्या चाकांची मोटार सायकल आदि यंत्रे शिंदे यांनी आपल्या कल्पक वृत्तीतून तयार केली आहेत.

नवी दिल्ली येथीलकृषी प्रदर्शनातही प्रमिला शिंदे यांनी नर्सरी बॅग पद्धतीने केलेल्या कपाशींच्या लागवडीची अनेकांनी माहिती जाणून घेतली. यावेळी दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनीही प्रमिला शिंदे यांच्या या नावीन्यपूर्ण प्रयोगाची प्रशंसा केली असल्याचे विकास शिंदे यांनी सांगितले.पाणी-उपसा यंत्राची निर्मितीगरज ही शोधाची जननी असते, ही उक्ती तंतोतपणे शिंदे यांनी तयार केलेल्या पाणी उपसा यंत्रासाठी लागू पडते. आमच्या गावात विजेच्या प्रश्न गहन होता. त्यामुळे पिकांना पाणी कशाप्रकारे देता येईल याचा विचार मी करत बसायचो त्यातून विजेच्या वापराशिवाय चालणाऱ्या यंत्राची निर्मिती करावी असा विचार माझ्या डोक्यात येऊ लागला असे शिंदे सांगत होते. त्यासाठी आवश्यक असणारे वेल्डींगचे शॉप, ड्रिलिंग मशिन आदि सामग्री माझ्याकडे होती. त्यामुळे पाणी-उपसा यंत्र निर्माण करण्याची धडपड सुरु झाली.

प्रथम यंत्रचे कच्चे ड्राईंग करुन वेल्डींग शॉपमध्ये असलेल्या यंत्राने वाया गेलेले सुटे भाग निवडून नवीन यंत्र बनविण्यास सुरुवात केली. या यंत्रात मोटार सायकलच्या इंजिनाच्या वॉटर पंपासारखा करण्याचे नियोजन केले हे यंत्र व्हील-पुली संकल्पनेवर आधारित होते. या यंत्रात विजेच्या ऐवजी मोटार सायकलच्या इंजिनाचा वापर केला गेला विहिरीजवळ एक लाकडी पुट्टा टाकून त्या पुट्ट्यावर मोटार सायकल ठेवून ती यंत्राला जोडली त्यानंतर गाडी सुरु केल्यानंतर गाडीच्या चाकाबरोबर “व्हील आणि पुली” फिरण्यास सुरुवात झाली. या यंत्राचा वपर करुन एका तासात विहिरीतून १२०० लिटर पाणी काढले जाते आणि यासाठी एक लिटर इंधन आवश्यक असते. हे यंत्र निर्माण केल्याने पिकांना आवश्यक पाण्याचा पुरवठा करता आला त्यामुळे उत्पादनात मोठी वाढ होऊन आर्थिक फायदा ही चांगला मिळाला असल्याने शिंदे यांनी सांगितले.शिंदे यांनी तयार केलेली अवजारे व यंत्रे पाहिली असता त्याचे जेमतेम शिक्षण, आर्थिक प्रतिकुलता कोठेही त्यांना रोखू शकले नाही हेच दिसून येते. त्यांचे हे संशोधन प्रत्यक्ष कृषी कामासाठी वापरण्यास अगदी सोपे व किफायतशीर असल्याचे सिद्ध झाले आहे.

बेगंलोर इंटरनॅशनल अ‍ॅटो शो- २०११
बेगंलोर येथील पॅलेस ग्राऊडंवर दिनांक ६ ते ९ जानेवारी, २०११ दरम्यान दुसऱ्या इंटरनॅशनल अ‍ॅटो शोचे आयोजन करण्यात आले होते. या शोमध्ये विकास शिंदे यांची “ सर्जा” या बहुउद्देशीय शेतगाडी प्रदर्शनात ठेवण्याचे निमंत्रण आयोजकांकडून आले होते. या शोमध्ये सर्जा या बहुउद्देशीय शेतगाडीला लोकांची चांगली पसंती मिळाल्याचे शिंदे यांनी सांगितले.तेथील कन्नड मीडिया व इंग्रजी माध्यमांच्या वृत्तपत्रांनी त्यांच्या या संशोधनाची योग्य दखल घेतली गेल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. या ग्रामीण संशोधकाने आपल्या संशोधक वृत्तीतून सर्व सामान्य शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण औजारांची व यंत्राची निर्मिती केली आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांनी भेडसावणाऱ्या “मजुरांचा तुटवडा” या प्रश्नावर एक रामबाण उपाय निर्माण झालाआहे.

सरकी लागवडीचा अभिनव प्रयोग
विकास शिंदे हे शेतीसाठी नानाविध यंत्राची निर्मिती करत होते त्यावेळी त्यांच्या पत्नी प्रमिला शिंदे ह्या कपाशीच्या लागवडीसाठी शेतावर अभिनव प्रयोग करत होत्या. प्रमिला शिंदे यांनी कपाशीचे महाग बियाणं वाया जाऊ नये म्हणून नर्सरी पद्धतीने पिशव्यामध्ये सरकीची लागवड केली जेव्हा इतर शेतकरी कपाशीची लागवड करत होते त्यावेळी शिंदे यांच्या नर्सरीतील कपाशीची रोपे कमी पाण्यावर एक ते दीड फुट वाढली होती. या नर्सरी पद्धतीचा कपाशीच्या लागवडीत वापर केल्याने वेळ, पैसा व श्रमाची बचत होऊन उत्पादनातही अनेक पटीने वाढ झाली आहे.