Tag Archives: सरदारपुत्र

अशी घडवली फ़ाटाफ़ूट

अकबर बादशहाचा शहजादा म्हणजे राजपुत्र आणि एक सरदार पुत्र यांची भलतीच दोस्ती जमली. सरदारपुत्र हा अत्यंत व्यसनी असल्यामुळे, त्यांच्या संगतीत आपला शहजादाही बिघडून जाईल, अशी भिती बादशहाला वाटली. साहजिकच त्याने त्या मित्राची संगत सोडण्याबद्दल आपल्या मुलाला बरेच सांगून पाहिले, परंतू त्याचा उपयोग होईना. उलट त्यांची मैत्री दिवसेंदिवस दृढावू लागली.

अखेर ‘या समस्येवर कोणता उपाय करावा,’ याबद्दल बादशहाने बिरबलला विचारलं असता तो म्हणाला, ‘खाविंद, शहाजाद्यांकडे तो सरदार पुत्र आला, की मला कळविण्याची आपण व्यवस्था करावी. पुढं जे काही करायचं, ते मी करीन.

दुसऱ्या दिवशी नित्याप्रमाने तो सरदारपुत्रही राजवाड्यावर आला आणि शहाजाद्याच्या खोलीत त्या दोघांच्या गुजगोष्टी सुरु झाल्या. एवढ्यात बादशहाच्या सेवकानं येऊन सांगितल्यामुळं बिरबल शहाजाद्याच्या खोलीच्या दरवाजापाशी गेला व त्याला उद्देशून म्हणाला, ‘शहाजादे, आपण जरा इकडे येता ? तुम्हाला एकट्यालाच एक अत्यंत गुप्त व म्हत्त्वाची गोष्ट सांगायची आहे.’

बिरबलाच्या विनंतीनुसार शहाजादा मित्राजवळून उठून त्याच्याजवळ गेला. शहाजाद्याच्या कानाशी तोंड नेऊन व अधूनमधून त्या सरदारपुत्राकडे दॄष्टी टाकून, बिरबल- प्रत्यक्षात काहीएक न बोलता -नुसताच त्याच्या कानात कुजबुजला, आणि मग त्याच्या मित्राला ऎकू जाईल एवढ्या मोठ्यानं म्हणाला, ‘शहाजादे, सांगायची नाही बरं का ही गोष्ट कुणाला? कुणी कितीही आग्रह केला, तरी अगदी शपथ घेऊन त्याला ‘मी नुसताच तुमच्या कानात पुटपुटलो’ म्हणून सांगायचं, पण मी सांगितलेलं गुपित फ़ोडायचं नाही.’ बस्स ! बिरबल एवढचं बोलला आणि शहाजाद्याला बोलायला अवसर न देता, तिथून झटदिशी निघून गेला.

बिरबल निघून गेल्यावर शहाजादा जेव्हा परत आपल्या मित्राजवळ जाऊन बसला, तेव्हा मित्राने त्याला विचारले, ‘शहाजादे ! बिरबलजींनी एवढं कसलं हो गुपित तुम्हाला सांगितल ?’शहाजादा म्हणाला, ‘दोस्ता ! बिरबलजींनी खरोखरच मला काहीएक सांगितलं नाही. ते माझ्या कानात नुसतेच पुटपुटले आणि ‘हे गुपित कुणाला सांगायचं नाही’ असं म्हणून निघून गेले.’

परंतू सरदारपुत्राचा शहाजाद्याच्या या बोलण्यावर विश्वास बसेना. आपण आपली सर्व गुपितं शहाजाद्याला सांगत असता, त्याने मात्र आपल्याशी असं आडपडद्यानं वागावं,’ या गोष्टीचा राग येऊन तो सरदारपुत्र जो तिथून तरातरा निघून गेला, तो पुन्हा कधी त्याच्याकडे आलाच नाही.अर्थात आपला हेतू बिरबलानं मोठया हिकमतीनं तडीस नेला, म्हणून बादशहा त्याला म्हणाला, ‘बिरबल ! तुझ्या चातुर्याला खरोखरच तोड नाही.’