Tag Archives: सरबजित

सल्लूचे सरबजितच्या सुटकेसाठी आवाहन

सलमान खान आणि सरबजित सिंग

सलमान खान आणि सरबजित सिंग

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याने सरबजितच्या सुटकेसाठी ट्विटरच्या माध्यमातून पाकिस्तानी जनतेला भावनिक आवाहन केले आहे.

‘सरबजितची सुटका व्हावी यासाठी मी पाकिस्तानी जनतेला मदत करण्यासाठी आवाहन करीत आहे. गेल्या २२ वर्षांपासून सरबजित पाकिस्तानातील तुरुंगात आहे. प्लीज… तुम्हाला अल्लाहचा वास्ता,’ असे त्याने ट्विट केल्यानंतर त्याच्या हजारो चाहत्यांनी त्याच्या ट्विटवर रिट्विट केले. त्याने लगेचंच ट्विट केली की, सरबजितवर दया दाखवण्यासाठी मी पाकिस्तानी जनता, प्रसार माध्यमे, सरकार आणि राष्ट्रपती झरदारी यांना विनंती करतो.

एका मागोमाग एक ट्विट करुन सलमानने एक मोहिमच सुरु केली. २२ वर्षांनंतर सरबजितला घरी पाठवणे हा एक शुभ संदेश ठरेल. मला आशा आहे की पाकिस्तानी जनता आम्हाला मदत करून एका कुटुंबाच्या आनंदात सहभागी होईल. अनेक दिवसांपासून सरबजितसाठी ट्विट करण्याची माझी इच्छा होती. सरबजितच्या बहिणीचा मी एक फोटो पाहिला आणि मला अतिशय दुःख झाले आहे. आम्हाला मदत करा, सरबजितच्या कुटुंबियांना मदत करा असेही ट्विटमध्ये त्याने आवाहन केले आहे. शेवटच्या ट्विटमध्ये त्याने पाकिस्तानी जनतेला सरबजितला भारतात परत पाठवण्याची विनंती केली आणि तुमच्याही मनात हीच इच्छा असल्याची आशा व्यक्त केली.

सलमानचे हे आवाहन त्याच्या आगामी चित्रपटाला म्हणजेच ‘एक था टायगर’ या चित्रपटाच्या प्रमोशनला जोडले जात आहे. सल्लूने हे ट्विट कोणत्या उद्देशाने केले हे माहित नसले तरी त्याच्या या ट्विटचा काय परिणाम होईल यावर भारतीयांनी लक्ष ठेवले आहे.