Tag Archives: सहनाववतु सहनौभुनक्तु

भोजनाचे यज्ञकर्म

रोजचे भोजन म्हणजे देखील हिंदू घराचा आणखी एक महत्त्वाचा संस्कार ठरतो. स्वयंपाक तयार झालाय, भोजनाची वेळ झालीय, पाने तयार आहेत, एकेक जण पानावर येऊन बसतोय, काही जण यायचे आहेत. पानात चटणी, कोशिंबीर, भाजी वाढून झाली आहे. पण तरीही कोणी ते खायला सुरुवात करायची नाही. कारण भोजनमंत्र व्हायचाय. सगळे जण उपस्थित झाल्यानंतर आणि सर्वांना सर्व पदार्थाचे वाढप झाल्यानंतर भोजनमंत्र म्हणायचा. तो झाल्यावरच भोजनाला सुरुवात होईल.

ताटातील गरमागरम पदार्थाच्या वासाने भूक प्रज्वलित झाली आहे. ( वेगळे सूप घ्यायची आवश्यकता नाही ) तरीही मनावर संयम ठेवायचा आहे. आधी अन्न हे पूर्णब्रह्म मानून मनोमन त्याला वंदन करायचे. मग केवळ उदरभरण म्हणून नाही, तर यज्ञकर्म म्हणुन भोजन घ्यायचे आहे. त्याआधी चित्राहुती घालायच्या आहेत. हेही एक प्रतीकच आहे. या चित्राहुती भोजनाला उपस्थित नसणारांसाठी – म्हणजेच सृष्टीतील सर्व सजीवांसाठी असतात. ‘ यज्ञकर्म आहे म्हणुन पहिला घास कधी शिळ्या अन्नाचा घेऊ नये, ” असेही सांगितले जायचे. शरीरात निर्माण होणारे पाचकरस व आरोग्य याला अनुसरूनच ही पद्धती आहे.

मुखी घास घेताना माझ्या हातून देशसेवा घडावी, देशसेवा करण्यासाठी अन्नातून शक्ती मिळावी, हा विचार प्रकट केला जातो व त्याच वेळी ‘ सहनाववतु सहनौभुनक्तु ’ आम्ही सगळे एक आहोत व एकत्वानेच काम करणार आहोत, ही भावनाही व्यक्त केली जाते. या विचारांनी ग्रहण केलेला अन्नरस रक्तात परिवर्तित होऊन सगळ्या शरीरभर पसरतो. यज्ञकर्मम देशसेवा, एकत्वाचा भाव अधिक दृढ होतो.