Tag Archives: साऊन देश

धुळे जिल्हा

हा प्रदेश प्राचीन काळी ‘रायका’ नावाने ओळखला जाई. यादवकाळात याच प्रदेशाचा ‘साऊन देश’ असा उल्लेख केलेल आढळतो. पुढे बहामनी काळात हा प्रदेश खानाचा देश म्हणून ‘खानदेश’ या नावाने ओळखल जाऊ लागला. ब्रिटिशकाळात जळगाव व धुळे मिळून ‘खानदेश’ हा एकच जिल्हा होता. जिल्ह्याने मुख्यालय ‘धुळे’ येथे होते. पुढे खानदेशाचे ‘पूर्व खानदेश’ व ‘पश्चिम खानदेश’ असे दोन भाग करण्यात आले. पश्चिम खानदेश म्हणजेच थोड्याफार फरकाने आजचा धुळे जिल्हा ! १९६१ मध्ये पश्चिम खानदेशाचे ‘धुळे जिल्हा’ असे नामकरण केले गेले.
प्राचीन काळी अभीर-अपभ्रंश अहीर- राजे सध्याच्या धुळे-जळगाव किंवा पूर्वीच्या खानदेश परिसरात राज्य करीत होते. या अहीरांची बोली ती ‘अहीराणी’ या भागात बोलली जाते.
‘भिल्ल’ ही राज्यातील एक प्रमुख आदिवासी जमात धुळे जिल्ह्यात केंद्रीत झाली आहे. या जमातीने स्वतःची वेगली अशी सामाजिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये प्राचीन काळापासून जपली आहेत. या प्राचीन जमातीचा उल्लेख रामायण व महाभारतातही आढळतो. ही जमात मूळची भू-मध्य सागरी हवामानाच्या प्रदेशातील असावी व हवामान स्थितीत परिवर्तन झाल्यामुळे तिने स्थलांतर केले असावे, असे मानले जाते.