Tag Archives: सागवान

सागवानाचा वृक्ष आणि कांटेझाड

एका अरण्याच्या मध्यभागी एक मोठा सागवानाचा वृक्ष उंच आणि सरळ वाढला होता तो नित्य आपल्या मोठेपणाच्या गर्वाने आपल्याखाली रुजलेल्या लहानसहान झुडपांचा धिक्कार करीत असे. त्या झुडपांमध्ये एक कांटेझाड होते, त्यास त्या सागवानाचा गर्विष्ठ स्वभाव न आवडल्यामुळे त्याने त्यास एके दिवशी स्पष्ट विचारले, ‘बाबा, तू एवढा गर्व कशासाठी वाहतोस ?’ म्हणाला, ‘मी सर्व वृक्षांमध्ये श्रेष्ठ आणि शोभिवंत आहे. माझा माथा मेघमंडळास भेदून गेला आहे, माझ्या फांदया सतत हिरव्या टवटवीत असतात. आणि तुम्ही तर इतकी नीच आणि क्षुद्र आहात की, जो येईल त्याने तुम्हांस खुशाल पायाखाली तुडवावे. माझ्या पानांवरून जो पावसाच्या पाण्याचा प्रवाह वाहतो, त्यानेच तुम्ही बुडून जाता.’ हे ऐकून कांटेझाड म्हणाले, ‘ते सर्व असो, पण मी तुला एकच गोष्ट सांगतो ती लक्षांत ठेव. जेव्हां एखादा लाकूडतोडया तुझ्या बुंध्यावर कुऱ्हाडीचा घाव घालावयास येईल, त्या वेळी आमच्यातल्या अगदी हलक्या झाडाच्या स्थितीशीही तू आपल्या स्थितीची अदलाबदल करावयास मोठया संतोपाने तयार होशील.’

तात्पर्य:- मोठेपणाच्या मागे अनेक दुःखे असतात, तशी लहानपणाच्या मागे नसतात. यासाठी मोठयांनी लहानांचा तिरस्कार करावा, हे अप्रशस्त होय.