Tag Archives: साटोऱ्या

साटोऱ्या

साहित्य :

  • अर्धा किलो बारीक रवा
  • अर्धा किलो साखर
  • पाव किलो मैदा
  • पाव किलो खवा
  • ५ ग्रॅम वेलचीची बारीक पूड
  • पाव किलो तूप

कृती :

साटोऱ्या करण्याच्या आदल्या दिवशी पाव किलो रवा तुपावर भाजून घ्यावा. खवा भाजून घ्यावा. त्यात वेलची पावडर व अर्धा किलो पिठीसाखर मिसळून सर्व मिश्रण एकत्र करून ठेवावे. दुसऱ्या दिवशी सकाळी पाव किलो रवा व पाव किलो मैदा परातीत घ्यावा. त्यात थोडे मीठ घालावे. पाव वाटी तेल गरम करून घालावे. पाण्यात किंवा दुधात भिजवावे. पीठ चांगले मळून घ्यावे. पीठ तीन ते चार तास भिजल्यावर साटोऱ्या करावयास घ्याव्या. आदल्या दिवशी जे सारण तयार केले आहे. त्याला थोडा दुधाचा हात लावून त्याचे बेताच्या आकाराचे लाडू करावेत. नंतर भिजवलेल्या पिठाचा गोळा साधारण लाडूच्या आकाराएवढा गोळा घ्यावा.त्याची पुरी लाटून त्यात एक लाडू ठेवून सर्व बाजूंनी पुरी बंद करावी व त्या गोळ्याची साटोरी हलक्या हाताने लाटावी. गरज वाटल्यास थोडी तांदळाची पिठी लावावी. ती साटोरी गरम तव्यावर टाकावी. एकदा उलटून झाल्यावर त्यावर तूप सोडावे. साटोरी गुलाबी रंगावर करावी व नंतर ती ताटात काढावी. अशा पद्धतीने सर्व साटोऱ्या कराव्यात.