Tag Archives: साळूंकी

साळुंकी आणि कवडा

एका शेतकऱ्याने एक साळुंकी व एक कवडा असे दोन पक्षी विकत आणले; साळुंकी, तिचे गायन ऐकण्यासाठी, आणि कवडा, मारून खाण्यासाठी. जेवणापूर्वी त्याने आपल्या बायकोस, कवडा मारून त्याची कढी करण्यास सांगितले. त्याप्रमाणे ती ज्या ठिकाणी ते पक्षी ठेवले होते तेथे गेली व तेथे काळोख असल्यामुळे, कवडयाच्या ऐवजी चुकून तिने साळुंकी घेतली. त्या साळुंकीची ती आता सुरीने मान कापणार, इतक्यात त्या साळुंकीने गायनास प्रारंभ केला व त्यामुळे तिचा जीव वाचला.

तात्पर्य:- पुरी खात्री करून घेतल्याशिवाय एखादया प्राण्याचा जीव घेण्यास तयार होणे, हे मोठे पाप आहे. ज्याला मारावयाचे होते त्याला सोडून आपण भलत्यालाच मारले, असे मागाहून आढळून आले, तरी ती चुकी दुरूस्त करता येण्यासारखी नाही; यास्तव या गोष्टीचा पूर्वीच चांगला विचार झाला पाहिजे.