Tag Archives: सासवड

सासवड ची शिवालये

संगमेश्वर मंदिर सासवड

संगमेश्वर मंदिर सासवड

सासवड पुणे हे अंतर ३४ कि.मी आहे. पुर्वी इथं सहा वाडया होत्या कालांतराने त्याचे गावात रुपांतर झाले म्हणुन सासवड अशी अख्यायिका आहे. सासवडच्या आसपासची अनेक ठिकाणं पर्यटनासाठी प्रसिद्ध तर आहेच पण त्याचबरोबर सासवडचं धार्मिक आणि ऎतिहासिक महत्व संस्मरणीय आहे. सासवड हे मंदिरे आणि प्राचीन वाडयांचे गाव आहे असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही. गावातून सहज फेरफटका मारला तर याचा प्रत्यय येतो. सासवडमधील वटेश्वर संगमेश्वर, सिध्देश्वर ही तीन पांडव कालीन शिवमंदिरे प्राचीन स्थापत्य कलेचा अदभूत आणि नयनरम्य नमूना आहे. श्रावणी सोमवारी इथे भक्तगण तर गर्दी करतात. सासवड आणि आजुबाजूच्या भागात असणार्‍या स्वंयभू शिवालया मागची आख्यायिका रंजक आहे.

जेजुरी पासून १० कि.मी अंतरावर पांडेश्वर गाव आहे. अज्ञातवासात असताना या ठिकाणी पांडवांचे काही काळ वास्तव्य होते. वास्तव्यादरम्यान त्यांना या भागात पाण्याचे दुर्भिक्ष असल्याचे जाणवले. त्यावेळी ब्रम्हदेव गराडे इथं जलपुर्ण कमंडलू घेऊन समाधिमग्न बसले होते. कृष्णाने भिमाला हा कमंडलू कलंडून देण्यास सांगितला. त्यातून वाहणार्‍या जलधारेतून सरिता वाहील आणि पाण्याचा प्रश्न सुटेल असे कृष्णाने सुचविले. भिमाने समाधिमग्न असलेल्या ब्रम्हदेवाला जागे करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा प्रयत्न असफल झाला. ब्रम्हदेवाला सावध करण्यासाठी भिमाने ब्रम्हदेवाच्या मस्तकावर शीतल जल ओतले, क्रोधित झलेले ब्रम्हदेव भिमाच्या मागे लागले. ब्रम्हदेव शिवभक्त असल्याने भिमाने वाटेत शिवलिंगे तयार केली शिवलिंगाची पुजा केल्याशिवाय ब्रहमदेव पूढे जात नव्हते. ब्रम्हदेवांच्या कमंडलु चे नाव होते करा, करामधून जन्मलेली म्हणून कऱ्हा. भिमाने ज्या ज्या ठिकाणी शिवलिंगे तयार केली आजही त्या ठिकाणी भव्य शिवालये आहेत. कोटेश्वर, सिध्देश्वर, संग्मेश्वर, पांडेश्वर ही याची उदाहरणे.

संगमेश्वर
संगमेश्वर मंदिराचे फोटो
सासवड बसस्थानका पासून १ कि.मी अंतरावर संगमेश्वर हे पांडवकालीन स्वंयभू महादेवाचे मंदिर आहे. कऱ्हा आणि चांबळी (भोगवती) या नदयांच्या संगमावर संगमेश्वर आहे. मंदिराच्या दगडी पायऱ्या चढून गेल्यानंतर समोर दृष्टिस पडतो तो स्थापात्य आणि शिल्प कलेचा अदभुत नजारा. तीस दगडी खांबावर उभारलेला प्रवेश मंडप आणि त्याच्या दोन्ही बाजुस असलेल्या दीपमाळा, प्रवेश मंडपातील नंदी, मंदिरातील कोरीव कासव, मंदिरावरील सुबक नक्षीकाम नजरेत साठवून ठेवावसं वाटतं. प्रवेश मंडपाच्या दक्षिणोत्तर प्रवेश दार आहेत. विशेष म्हणजे या मंदिरातील नंदिचे तोंड पश्चिमेस आहे. मंदिराच्या परिसरातील तुळशी वृंदवनाची रचना ही कल्पक आहे. ७ ते ८ फुट उंचीच्या या तुळशीवृंदावनात वर तुळस मध्यभागी शिवलिंग आणि खाली पाया. तुळशीला घातलेले पाणी मध्यभागी असलेल्या महादेवाच्या पिंडीवर पडते. मंदिराच्या दक्षिणेस घाट व कऱ्हा तीर आहे. या तीरावर खडकेश्वर आणि सतींची मंदिरे आहेत. उत्तरेला चांबळी च्या तीरावर ही महादेवाचं मंदिर आहे.

वटेश्वर (चंगावटेश्वर)
सासवड बसस्थानकापासून ३ ते ४ कि.मी अंतरावर वटेश्वर हे जागृत स्वंयभू मंदिर आहे. हे पांडवकालीन शिवमंदिर स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना आहे. मंदिर पुर्वाभिमुखी असून मंदिराला २५ दगडी पायऱ्या आहेत. या ही मंदिराची रचना संगमेश्वरशी मिळतीजूळती आहे. दीपमाळ, कासव, नंदी, तुळशी वृदांवन नजरेत भरणारे आहे. मंदिरावरील नक्षिकाम अप्रतिम आहे. सजवलेले वाघ, सिंह, घोडे, मर्कट, पानं, फुलं हे कोरीव काम अत्यंत विलोभनीय आहे. या मंदिराच्या खालील बाजुस चांगदेव स्वामीची समाधी आहे. या मंदिराचा जिर्णोध्दार सन १७०० मध्ये अंबाजी परंदरे यांनी केला. भारतचे पहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्रप्रसाद यांनी १८ नोव्हेंबर १९५४ साली या मंदिराला भेट दिली होती.

सिध्देश्वर
हे शिवमंदिर ही पांडवकालीन असुन या मंदिराचे स्थापत्य मन मोहणारे आहे. सासवडपासून १ कि.मी अंतरावर हे मंदिर आहे.

या शिवालयां व्यतिरिक्त गावात आणखीही बरीच मंदिरे आहेत जी इतिहासाची साक्ष देत आहेत. सोपानकाका मंदिर, भैरवनाथ मंदिर. शिवसृष्टी संग्रहालय, आबाजी पुरंदरेचा वाडा अशा एक ना अनेक गोष्टीमुळे सासवड ला एक तरी भेट अवश्य दयावीच.