Tag Archives: सुर्यग्रहण

गुरु नानकांची नेमबाजी

शीख धर्मपंथाचे संस्थापक गुरु नानक यांना व्याख्यानबाजीपेक्षा एखाद्या प्रत्यक्ष कृतीद्वारे आपले तत्व दुसऱ्यांच्या गळी उतरविण्याची हातोटी अतिशय सुंदर जमली होती.

एकदा सुर्यग्रहणानिमित्त हरिद्वार कुंभमेळा भरला असता, नानकजी तिथे गेले तिथे लोकांना उगवत्या सुर्याच्या दिशेनं गंगाजल फ़ेकताना पाहून, स्वत: नानकजी गंगेच पाणि पश्चिम दिशेला उडवू लागले.
सर्व यात्रीकांच्या उलट चाललेलं त्याचं वागणं पाहून काहीजण खो खो हसू लागले, तर काहीजण त्यांच्याजवळ जाऊन विचारू लागले, ‘काय हो, तुम्ही आंधळे आहात की वेडे आहात ? पूर्वेला उगवलेल्या सुर्याला गंगाजळ अर्पण करण्याएवजी, तुम्ही ते पाणी पश्चिमेला का फ़ेकता ?’

नानकजींनी विचारलं, ‘तुम्ही ते पाणी पूर्वेकडे का फ़ेकता ?’

लोक म्हणाले, ‘सुर्याला ते पाणी मिळावं, म्हणून आम्ही ते पूर्वेकडे उडवीत आहोत.’

नानकजी म्हणाले, ‘गोष्ट अशी आहे; पश्चिमेस पाच पन्नास कोसांवर असलेल्या माझ्या गावी यंदा पाऊस न पडल्याने, तिथे सुकुन जात असलेल्या माझ्या शेताच्या दिशेनं मी पाणी फ़ेकत होतो. तेवढं पाणी मिळालं तरी शेतातल्या रोपांना टवटवी येईल.’

लोक हसून म्हणाले, ‘पाच पन्नास कोसांवर असलेल्या तुमच्या शेताला इथून फ़ेकलेलं पाणी कसं मिळू शकेल ?’

यावर नानक हसून म्हणाले, ‘अहो, लक्षावधी कोसांवर असलेल्या सुर्याला जर तुम्ही इथून फ़ेकलेलं पाणी मिळतं, तर अवघ्या पन्नास कोसांवर असलेल्या माझ्या शेताला मी इथून फ़ेकलेलं पाणी का मिळू नये ?’

नानकजींच्या या बिनतोड युक्तीवादानं, सुर्याच्या दिशेनं पाणी फ़ेकणाऱ्यांचे डोळे उघडले व नानकजींच्या पुढे त्यांनी वाकून त्यांना भक्तिभावाने अभिवादन केले.