Tag Archives: सॅनॅरिटनस

स्त्रि मानसिक रोग : शोध आणि बोध

सगळं सहन करणारी संयम असणारी, वेळप्रसंगी जिद्दीनं उभी राहणारी स्त्री मनोविकारानं झपाटली का जाते ? याला कोण असतं जबाबदार ? समाज ? परिस्थिती ? कुटुंबीय ? का सगळेच ?

‘स्त्री जन्मा ही तुझी कहाणी” या परिचित म्हणीचा प्रत्यय आजच्या वृत्तपत्रातील बातम्यांतून हल्लीच्या काळांत कधी नव्हता इतका येतो. स्त्रियांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत. मग ते घरात असोत वा रस्त्यावर असोत, नवऱ्याकडून असोत, वा परपुरूषाकडून असोत, चोरांकडून असोत वा पोलिसांकडून असोत. सहाजिकच अशा अशाश्वत वातावरणात स्त्रियांच्या मानसिक प्रकृतीचा बळी पडला तर नवल नव्हे. मानसिक चिकित्सकांकडे येणाऱ्या स्त्र्यियाचे प्रमाण आजकाल नक्कीच वाढलेले आहे.

निसर्गाने स्त्री जातीला जीवशास्त्रीय कर्तव्यपूर्तीसाठी सहनशक्ती व संयमशक्ती पुरुषजातीपेक्षा कितीतरी जास्त दिलेली असली तरी सध्याचं आधुनिक असल्यामुळं आणि जुन्या संस्कृतीत आधार देणारे दीर्घकालीन मातृत्व आता क्षीण झाल्यामुळे त्यांचे मानसिक स्वास्थ्य जास्त प्रमाणात बिघडायला लागते आहे. एकत्र कुटुंबपद्धती नष्ट होऊन स्वतंत्र कुटुंबपद्धती प्रचलित झाल्यामुळे आणि संसार करायची नैतिक जबाबदारी अजून बयकांवरच असल्यामुळे, त्यांच्या मनावरील ताण वाढतो आहे. तसेच आधुनिक स्त्री घराबाहेर पडल्यामुळे घर, नोकरी आणि मुले सांभाळणे त्यांना तारेवरची कसरतच वाटणे स्वाभाविकच आहे. ह्या विविध भूमिकांपैकी काही भूमिका परस्पर-विरोधी असल्यामुळे स्त्री गोंधळून जाते. आणि तिच्या मनावर सतत ताण पडत राहातो.

मानसिक ताण
आर्थिक सामाजिक अडचणीने हा ताण आणखी वाढतो. विशेषतः नागरी जीवनात जागेच्या अडचणींमुळे लहानसं घर मोठ्या कुटुंबामुळे अशांत होते व अशा घरात चोवीस तास राहाणाऱ्या गृहिणींना त्रास असह्य होतो. काही वेळा नवऱ्याची बदलीची किंवा फिरतीची नोकरी असल्यास एकतर परप्रांतात जाऊन राहावे लागते. किंवा मुलांच्या शिक्षणासाठी नवऱ्याला सोडून एकटीनंच राहाव लागतं. संसार करावा लागतो. लागोपाठ बाळंतपणे आणि काबाडकष्ट यांचीपन जबरदस्ती झाल्यास शारीरिक अथवा, मानसिक थकव्याला पुस्ती जोडतो. हा सर्व मानसिक ताण गृहिणी हुशार, व्यवहारचतुर मनाने खंबीर असल्यास, तसंच नवऱ्यांशी व मुलांशी समजुतीचे प्रेमाचे संबंध असल्यास तिची मानसिक प्रकृती टिकून राहाते. परंतु व्यक्तिमत्त्वच कच्चे असल्यास वैकल्य व ताण यांचा अतिरेक होऊन शेवटी मानसिक विकाराला आमंत्रण मिळते.

मानसिक विकारांचे दोन प्रकार
स्त्रियांत होणाऱ्या मानसिक विकारात दोन प्रकार प्रचलित असल्यामुळे महत्त्वाचे आहेत; उन्माद व अवसाद उन्मादाचा प्रादुर्भाव तरुण वयात जास्त असतो. उपचारासाठी त्या मानानं थोड्यात रुग्णा येतात, याचे कारण ह्या दुखण्यातील काही महत्त्वाची लक्षणं. उदा. अंगात येणे, दातखिळी बसणे संस्कृतिमान्य असल्यामुळे त्यांना आपल्या अनाभिज्ञ समाजात दुखणं असं मानलंच जात नाही. हा विकार पुरुषांच्या मानाने स्त्रियांना जास्त जडायचे मुख्य कारण त्यांचं जीवशास्त्रीय-सामाजिक कौटुंबिक आणि पर्यायानं मानसिकदृष्ट्या दुय्यम असलेले स्थान, स्त्री एक असहाय्य, सहानुभूतीस पात्र असलेली अबला अशी भूमिका तिच्यावर लादली गेलेली आहेच. अशा स्त्रिया साधारनपणे मानी आणि हळव्या असतात आणि मानहानी झाल्यास त्यांचा भावनिक क्षोभ असह्य होतो. आत्मकेंद्रित म्हणजे आपल्या स्वतःभोवतीच जगानं फिरावं अशी अपेक्षा त्यांची असते. त्यामुळे इतरांचं लक्ष वेधून घ्यायची प्रवृत्ती असते. त्याचप्रमाणे सूचनक्षमता, म्हणजे सुचलेली कल्पना न तपासून पाहाता मान्य करायची तयारी असते. ह्यामुळे त्यांना मोहनिद्रेच्या आमलाखाली सहज आणता येते. त्यांची वृत्ती एकंदरीत असमाधानी असते. पूर्वायुष्यात अतिलाड किंवा त्याउलट भावनिक उपासमार झाल्यानेही हा विकार जडतो.

लक्षणांवर सुरुवात कशामुळे होते ?
(१) आत्मप्रतिष्ठेला धक्का देणारे अनुभव उदा. चारचौघात झालेली फजिती किंवा हेटाळणी.
(२) शैक्षणिक जीवनात अथवा लग्न जुळण्यात आलेले अपयश .
(३) आधीपासून लाड करणाऱ्या आईची अथवा वडिलांची मर्जी मोठेपणीपण कायम राहावी. म्हणून त्यांना काळजी वाटेल अशी वागणूक ठेवणं.
(४) वैवाहिक जीवनात लैंगिक संबंधाबद्दल भीती अथवा असमाधान.
(५) सासूशी झालेल्या भांडणात नवऱ्याने आपली बाजू न घेतल्यास. नवऱ्याचं लक्ष परस्त्रीवर जातं अशी जाणीव झाल्यास.
अशा तऱ्हेने लक्षणांना सुरुवात होते. लक्षणांचा हेतू वरील समस्यातून एक पळवाट असाच असतो.

उन्मादाची लक्षणे
उन्मादी लक्षणाचे दोन वर्ग केलेले आहेत. परीवर्तनीय लक्षणे व बोधविच्छेदनीय लक्षणे.
पहिल्या वर्गात शारीरिक दुखण्याचं अनुकरण करणारी लक्षणे सामावलेली आहेत. उदा. वेदना किंवा बधीरता, हुळेपणा, झटके, कंप, सतत उलट्या, उचक्या अथवा ढेकरा, आंधळेपणा, बहिरेपणा क्षुधानाश. बहुधा लक्षणांचे स्वरूप रुग्णाच्या त्या तऱ्हेच्या विकाराच्या कल्पनेवर अवलंबून असतं. अर्थात वैद्यकीय ज्ञान नसल्यामुळे मूळ किंवा अस्सल दुखण्यात आणि त्यांचे अनुकरण केलेल्या लक्षणात बराच फरक असू शकतो. कधी कधी त्यांचे अनुकरण इतके हुबेहुब असते की डॉक्टरपण संभ्रमात पडतात.

दुसऱ्या वर्गातील लक्षणांत, अंगात येणे, शुद्ध हरपणे (दातखिळी) स्मृतिभ्रंश ही मुख्य आहेत. पैकी पहिली दोन प्रचलित आहेत. शुद्ध हरपण्याला चारचौघे फीट म्हणतात करे म्हणजे शारीरिक दुखन्यातील फीटच्या प्रकारापैकी मुख्य प्रकार अपस्मारीचा  (epilepay)  असतो; ज्यात खरी शुद्ध हरवते आणि एक मिनिटभर सर्वांगाला झटके येतात. काही वेळा जीभ चावली जाते किंवा कपड्यात लघवी होते. तसेच ही “फीट”” केव्हाही कुठेही येते आणि काही वेळानंतर शुद्ध आपोआपच येते. परंतु उन्मादी “फीट” बहुधा सुरक्षीत ठिकाणी, चारचौघात येते आणि शुद्ध खरी जातच नाही पण रुग्णा निपचित डोळे मिटून पडून राहाते. कधी कधी तासभरसुद्धा. डोळे वा तोंड उघडण्याचा प्रयत्न केल्यास त्याला सबळ विरोध केला जातो. पाणी तोंडात घातल्यास ते बाहेर येते ह्यालाच दातखिळी म्हणतात. स्वतःला इजा होणार नाही ह्याची खबरदारी रुग्णा घेत असते. अशी “फीट”” नाट्यमय वातवरणात महत्त्वाच्या व्यक्तींच्या उपस्थितीत व योग्यवेळीच येत असते. (आपण जगायला लायक नाही. सगलं जग आपल्या विरुद्ध उठलं आहे याविचारांमुळे काही स्त्रियांमध्ये वैफल्य निर्माण होते आणि त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार सुरू होतात. )

“अंगात येणे”” हा अनुभव धार्मिक-पारंपारिक श्रद्धांवर आधारलेला असल्यामुळं ह्या लक्षणाला धर्मभोळे लोक विकार समजतच नाहीत. अशा लोकांच्या मते काही प्रेषित म्हणजे दैवी शक्तीचा आशीर्वाद असलेल्या लोकांच्या अंगात देव, देवी, मृतात्मे किंवा काहीवेळा भुत्ते शिरतात; आणि मग अचानक ती व्यक्ती झपाटल्यासारखे नेहमीपेक्षा वेगळे व विचित्र वागते. आवाज व वृत्ती बदलते. शारीरिक ताकद व बौद्धिक क्षमता वाढल्यासारखी भासून ती व्यक्ती काही वेळ असामान्य वर्तन करते, घुमते, नाचते व भाकितेपण सांगते.

ह्या विकाराचा उपयोग काही जाचलेल्या सुनांना बरच होतो. कारण कजाग सासवा त्यांना नमतात व त्यापुढे त्यांना वचकून राहातात. काहीवेळा आपल्या भौतिक गरजा पुरविण्यासाठी त्यांना झपाटणारे आत्मे नवऱ्याला व सासूला ठणकावून सांगतात. जेव्हा वर्तन विक्षिप्त किंवा त्रासदायक होते किंवा अंगात येण्यावर नातेवाइकांचा विश्वास नसतो तेव्हाच डॉक्टर किंवा मानसचिकित्सकाकडे केस नेली जाते. ह्या लक्षणांच्या उपचारासाठी सुरुवातीलाच नाट्यमय उपचार म्हणजे मोहनिद्रा वगैरेंचा प्रयोग केल्यास तो फसतो किंवा तात्पुरत फायदा होतो. परंतु मूळ कारणे तशीच राहातात व दुखणे पुन्हा उद्भवते. यासाठी दुखण्यामागे पार्श्वभूमी समजून घेणे अत्यंत आवश्यक. उन्मादी स्त्रीचे व्यक्तिमत्व (म्हणजे स्वभाव, अपेक्षा, वृत्ती आणि सवयी ) समजून घेतल्यावर तिच्या कौटुंबिक संबंधाची नीट चौकशी झाली पाहिजे. बऱ्याच वेळा कौटुंबिक घटना दडवल्या जातात. त्याबद्दल मनोविश्लेषाणाने कल्पना येते, विशेषतः निवांतक इंजेक्शनच्या साहाय्याने केलेल्या विश्लेषणाने  ( Narco-analysis )  अशा विश्लेषणानंतर मानसोपचाराची गरज असते. त्यात रुग्णाच्या कोंडलेल्या भावनांना वाट फोडल्यानंतर तिला आधारदायी मार्गदर्शन दिले जाते. तसेच तिची दुखणाइताची भूमिका व अनिष्टवृत्ती बदलण्याचा आग्रह केला जातो. सहानुभूती आणि खंबीरपणा यांचा योग्य मिलाफ दाखवला तरच मानसचिकित्सकांना यश मिळते. त्यानंतर तिच्या निकटवर्तीयांची वृत्ती बदलण्याचा प्रयत्न करणे तसेच रुग्णाच्या योग्य गरजा पुरवायला सांगणे अत्यंत जरुरीचे असते. कारन त्याशिवाय त्याच्यातला छुपा संघर्ष  ( cold-war)  संपत नाही उन्मादी लक्षणे हटत नाहीत.

उदासीनता
अवसाद किंवा उदासीनता ह्यालापण सहसा विकार म्हणुन मानले जात नाही. कारण कोणत्याही दुर्घटनेमुळे किंवा संकटाच्या असह्य ताणामुळे साधारण माणूस दुःखी होत असतो. उदासीनतेचे प्रकार मुख्यत्वे तीन आहेत-अवसादी प्रतिक्रिया अवसाद आणी जराजन्यपूर्व (Involutional)  अवसाद. पहिल्या प्रकाराला सांप्रत वातावरणातील अप्रिय बदल अथवा घटना जबाबदार ठरतात. काळजीखोर व विचारी व्यक्ती त्या दुर्घटने बद्दल स्वतःला दोषी ठरवतात. आणि आपल्या अपयशाबद्दल व चुकांबद्दल दुःखी कष्टी होतात. त्यामुळे त्यांची आत्मप्रतिमा डागाळली जाते. ह्या प्रकारात चिंत्ता किंवा अतिविचार ही मुख्य लक्षणे आहेत. आत्महत्येबद्दल विचार आले तरी प्रयत्न केला जात नाही. दुसऱ्या प्रकारात उदासिनतेचे प्रमाण जास्त असते. परंतु त्यास काही खासकारण नसते. लक्षणात निद्रानाश, क्षुधानाश, निष्क्रीयता स्वतःच्या अपराधीपणाबद्दल खात्री, स्वतःचे अत्यंत नुकसान व हानी झाली आहे, सर्व बुडाले, पुढे आशा नाही अशा दृढ कल्पना (संभ्रम) आणि म्हणून आपण जगण्यास लायक नाही अशा भावनेतून आत्महत्येची इच्छा व बऱ्याचवेळा कृतीपण !

स्त्रियात आत्महत्येपेक्षा ‘आत्महत्येचे प्रयत्नच’ जास्त प्रचलित आहेत. कारण त्यांचे जीवन नवऱ्याच्या मानानं परावलंबी व एकाकी असते. ह्या दोन प्रकारात फरक तो असा की आत्महत्येत मृत्यूला कवटाळले जावे अशी आंतरिक ओढ असते. संपलेले असते. किंबहूना झालेल्या अपराधांबद्दल ती व्यक्ती प्रायश्चित घेऊ पाहाते. त्यामुळे आत्महत्त्येची तयारी इतरांना समजूनं न देता केली जाते. व कुणीही शेजारी  नसताना किंवा रात्री झोपल्यावर चुकणार नाही याची खात्री करूनच प्रयत्न केला जातो. असे प्रयत्न बहुधा यशस्वी होतात.

आत्महत्येचा ‘प्रयत्न’ हा प्रकार निराळा असतो. म्हणजे मरण्याचे विचार असले. तरी तीव्र इच्छा नसते. त्याचप्रमाणे पुरुषाइतकी आक्रमकता त्यांच्यापाशी नसते. त्यामुळे केलेला प्रयत्न तितका प्रभावी होत नाही. काही वेळा मनाची तेवढी तयारी झालेली नसते. त्यामुळे प्रयत्न केल्यास कळत नकळत तो यशस्वी ( ‘अंगात येणे’ हा प्रकार अपल्याकडे धार्मिक-पारंपारिक श्रद्धांवर आधारलेला असल्यामुळेया लक्षणाला धर्मभोळे लोक मनोविकार समजत नाहीत.) होणार नाही हाची खबरदारी घेतली जाते. त्या प्रयत्नामागे उदासीनतेपेक्षा रागाची भावना किंवा मदतीची याचना जास्त असते. अर्थात काहीवेळा घोटाळे होऊन असा प्रयत्न चुकून यशस्वी होतो ती गोष्ट निराळी.

असा अविचार करण्याचे प्रसंग म्हणजे कडाक्याचे भांडण विशेषतः नवऱ्याशी, चारचौघात केलेला पाण‍उतारा किंवा हृदयाला भिडणारे आरोप; आघातजन्य दुर्घटना. उदा. म्रुत्यू किंवा अचानक आलेले असह्य सामाजिक हा आर्थिक संकट; नवऱ्याचे दुसरीशी संबंध आहेत हे कळल्यावर होणारे मत्सरी दुःख, असह्य किंवा असाध्य शारीरिक दुखणे, भावना उफाळून झालेल्यावेळी आत्महत्येच्या साधनांचे सान्निध्य, अपराधी भावना बाळगणाऱ्या स्त्रियांकडून काही प्रयत्न म्हणजे दिव्यातून पार पडण्यासाठी केलेली सत्वपरीक्षाच असते. अवसादी लक्षणावरील मुख्य उपाय म्हणजे अवसादरीची औषधे, मानसोपचार म्हणजे रुग्णाची मनोपार्श्वभूमी व विचार पूर्णपणे समजून घेऊन तिला दिलेले उत्तेजनपूर्वक व आधारदायी मार्गदर्शन तीन व न हटणाऱ्या लक्षणासाठी विद्युत उपचार हे होत.

सामाजिक प्रतिबंधात्मक उपाय
या दोन प्रचलित विकारांवर प्रतिबंधात्मक उपाय योजणे जरी कठीण असले तरी अव्यवहार्य नाही. सामाजिक प्रयत्नात आधी लोकशिक्षण महत्त्वाचे आहे. विशेषतः उन्मादी लक्षणाबद्दलच्या जुन्या कल्पना व श्रद्धा किती चुकीच्या आहेत ह्याची उदाहरणासहित माहिती प्रसिद्धी माध्यमातून रेडिओ व दूरदर्शनवरील शास्त्रोक्त व्याख्यान अथवा परिसंवादातून द्यायला हवी. वैयक्तिक केसच्या बाबतीत प्रथम त्या दुखण्याची पूर्ण कल्पना आधी कुटुंबियांना व नंतर रुग्णाला दिली पाहिजे. त्यानंतर शक्यतो रुग्णाने स्थलांतर केले पाहिजे. म्हणजे भावी व लोभी लोकांचा त्रास चुकेल. मानसचिकित्सेचा उपचार पूर्ण झाल्यावरसुद्धा वारंवार येणाऱ्या लक्षणांकडे नियंत्रित दुर्लक्ष-म्हणजेच उत्तेजनाचा अभाव-केल्यास लक्षणे हळूहळू क्षीण होतात व शेवटी थांबतात.

आत्महत्त्येच्या बाबतीत असे प्रयत्न का व कसे केले जातात आणी कोणती खबरदारी घ्यावी ह्याचे लोकशिक्षण प्रसिद्धीमाध्यमाद्वारे केले पाहिजे. प्रत्येक वैयक्तिक प्रयत्नामागील पार्श्वभूमी चौकशीने किंवा मनोविश्लेषणाने समजून घेतली पाहिजे व सामाजिक वातावरणातील तापदायक घटक काढून टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोंडलेल्या भावनांना मनोविश्लेषणाद्वारे वाट फोडली पाहिजे किंवा सामाजिक वा आर्थिक ताण सुसह्य करण्यासाठी समाजकल्याणकारक वा पुनर्वसनरूपी प्रयत्न केला पाहिजे. स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांणा वाचा फोडलेली असली तरी अजून कायदायंत्रणा व शासन अशा अत्याचारांचे उच्चाटन करण्यासाठी लागणारे कडक उपाय योजत नाहीत. स्त्रियांनीच पुढाकार घेऊन ह्यासाठी चळवळ केल्याशिवाय उदासीन पुरुषवर्ग जागा होणार नाही.

आत्महत्या करणाऱ्यांना शेवटच्या क्षणी परावृत्त करण्याच्या द्रुष्टीने चालवली जाणारी “सॅनॅरिटनस” नावाची आंतराष्ट्रीय संस्था आहे. त्या संस्थेतर्फे समाजसेवक टेलिफोनवर अशा आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांना ऐनवेळी बोलायची संधी, सहानभूती व आपुलकीची भावना देतात तसेच पुढे वाटल्यास आर्थिक-सामाजिक मदत देतात. आपल्या देशात अशी यंत्रणा फक्त मोठा शहरातच शक्य आहे. कारण टेलिफोनची सवय असणाऱ्या स्त्रियाच आत्महत्येच्या अथवा समक्ष भेटून आत्महत्येपासून परावृत्त करणे पण शक्य आहे; परंतु अचानक केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना नव्हे. अशा तऱ्हेच्या सोयी निदान सर्व मोठ्या शहरांत उपलब्ध करून देणे शासनाचे व समाजदेवा संस्थाचे तसेच रुग्णालयातील मानसचिकित्सा विभागाचे कर्तव्य आहे.

अवसादी लक्षणे आधी ओळ्खून त्यांचा वेळीच उपचार करणे हाच व्यवहार्य व प्रतिबंधात्मक उपाय आहे. त्यासाठी समानेच पुढे आले पाहिजे.