Tag Archives: सैन्य

मांजरे आणि उंदीर

एकदा मांजरे आणि उंदीर यांची लढाई फार चालली होती, त्यात प्रत्येकवेळी उंदरांचा पराभव होऊन त्यांस पळून जावे लागत असे. एके दिवशी सगळे उंदीर जमून आपल्या पराभवाचे कारण काय याचा विचार करीत असता त्यांच्या दृष्टोत्पत्तीस असे आले की, आयत्या वेळी, आपल्याकडील सेनापती कोण आहेत, हे आपल्या सैनिकांस ओळखता येत नसल्यामुळे आपला परभव होतो, यासाठी सेनापती कोण हे ताबडतोब ओळखता यावे असे काही तरी चिन्ह सेनापतीने धारण करावे, असे त्यांनी ठरविले. प्रत्येक सेनापतीने आपल्या मस्तकावर खुणेसाठी गवताची एक लहान मोळी बांधावी, असा ठराव सर्वानुमते पसंत होऊन तो अमलात आला. त्याप्रमाणे ते चिन्ह धारण करून उंदरांचे सगळे सेनापती आपापल्या सैन्यासह लढाईवर गेले. परंतु मांजरांपुढे उंदरांचे काय चालणार ? त्यांचा पराभव होऊन ते सगळे पळत सुटले आणि जीव वाचविण्यासाठी बिळांत शिरले. अशा रीतीने शिपायांनी आपला बचाव केला, परंतु सेनापतींची स्थिती फार वाईट झाली. त्यांच्या कपाळावर गवत बांधलेले असल्यामुळे त्यांस बिळात शिरता येईना व शेवटी ते सगळे मांजरांच्या भक्ष्यस्थानी पडले.

तात्पर्य:- मोठेपणाबरोबरच मनुष्याची जबाबदारी आणि संकटे वाढत असतात.