Tag Archives: स्ट्रक्चरल ऑडिट

या दुर्घटनेची सखोल चौकशी होणार

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी घोषित केले की, सर्वांत आधी कामकाज पूर्ववत सुरु होण्यालाच प्राधान्य दिले जाईल आणि मंत्रालय येत्या सोमवारी सुरु करण्यात येईल. आगीचे हे प्रलय राज्यातील सर्वांत मोठे आघात आहे व हे कोणत्या कारणामुळे घडले याची सखोल चौकशी करण्यात येईल, असे पत्रकारांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी एक गोष्ट मान्य केली की, आग आटोक्यात आली नाही कारण मंत्रालयात प्रतिबंधात्मक उपाययोजना नव्हती.

“२००८ मध्ये मंत्रालयातील अग्निसुरक्षा सदोष असल्याचा अहवाल सादर झाला होता. त्यावर उपाययोजना का केली गेली नाही, याची माहिती आपण घेऊ,” असे त्यांनी स्पष्ट केले. “मंत्रालयातील खात्यांसाठी पर्यायी जागा मिळवण्याच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. मात्र स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतरच इमारतीच्या फेरबांधणीबद्दल समजेल,” असे उत्तर त्यांनी एका प्रश्नाला दिले.

“चौथ्या मजल्यावरील महसूल खात्याशी संबंधित अतिरिक्त मुख्य सचिवांचे कार्यालय, नगरविकास मंत्रालय, तसेच ऊर्जा व वनखात्याची कार्यालये जळून खाक झाली. पाचव्या मजल्यावरील राजशिष्टाचार, मुख्य सचिवांचे कार्यालये, तसेच सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कार्यालयासह सामान्य प्रशासन विभाग आदी याचे भस्म झाले. मात्र, मंत्रालयातील सर्वच कागदपत्रे नष्ट झालेली नाहीत. काही दस्तावेजांचे संगणकीकरण करण्यात आलेले आहे. कार्यालयांसाठी जीटी रुग्णालय, एमटीएनएल या परिसरातील जागा ताब्यात घेतल्या आहेत. प्रकाशगड येथे ऊर्जा विभागाचे कार्यालय स्थलांतरित केले आहे,” असे पृथवीराज चव्हाण आगीमुळे झालेले नुकसान मांडताना म्हणाले.