Tag Archives: स्विमिंग

स्त्रि आरोग्य व खेळाचे महत्त्व

‘स्त्री’ म्हटले की नाजूक, कोमल, सौजन्यशील व्यक्तिमत्त्व डोळ्यांसमोर उभं राहाते. शारीरिक कष्टाची कामे पुरुषांनीच करावी असा अलिखित नियम कोणी सजविला ? कष्ट करूनही स्वतःचे शरीर बांधेसूद ठेवणाऱ्या कोणीही किंवा आदिवासी स्त्रिया आपल्या नजरेत पडतातच ना ? मात्र शहरातील सुविधांचा उपभोग घेणाऱ्या मुली-स्त्रिया जाड बेडौल झालेल्या आढळतात. मग ‘डाएटिंगचे फॅड’ का नाही पसरणार ? रक्तदाब, सांधेदुखी, हृदयविकाराचे प्रमाण वाढलेले का नाही ? आणि याला जबाबदार कोण तर – हीच कोमलांगी ललना !

पाश्चिमात्य देशात सकाळी अथवा सायंकाळी नियमितपणे धावण्याचा किंवा टेनिस, स्विमिंगचा सराव करणाऱ्या स्त्रियांची संख्या निश्चित अधिक आहे. ‘लोक काय म्हणतील’ याचा विचार करीत बसण्यापेक्षा बिनधास्तपणे स्विमिंग-सूट किंवा शॉर्टस घालून घराबाहेरील जागेत दोरीच्या उड्या मारून किंवा ‘जॉगिंग’साठी जाऊन लोकांची तोंडे गप्प करणेच या स्त्रिया पसंत करतील. कोणता ना कोणता खेळ खेळणे हे जीवनाचे एक अंग बनले आहे. बीचवर पिकनिकला गेल्यावर मनमुरादपणे खेळू घेण्यासाठी त्या धडपडतील. पूर्वीच्या कालातील फुगड्या, झिम्मे, गोप आदी केवल स्त्रियांचे म्हणून समजले  जाणारी खेळ आज फक्त मंगळगौर किंवा हरतालिकेलाच त्यांची आठवण करून देतात. मनोरंजनासाठी खेळ खेळणे ही मूळ कल्पना त्यामागे आहेच. मात्र आज अपवादात्मक खेल वगळता बहुतेक सर्व खेळ स्त्री-पुरुष दोघेही खेळतात. पूर्वी खेळांना राजाश्रय होता. आज शासकीय आश्रय आहे. मात्र अजूनही लहान मुलांना खेळण्यासाठी उत्तेजन देणारे पालक अभावाने आढळतात. खेळाचे महत्त्व पटण्यासाठी आधी खेळलेल पाहिजे.

श्रमाने थकलेल्या शरीराला, मनाला उल्हासित करण्यासाठी कोनताही आवडीचा खेळ उपयोगी पडू शकेल. कबड्डी-खो खो सारखे खेळ आयुष्यभर खेळणे शक्य नाही. परंतु काही वैयक्तिक खेळ- बॅडमिंटन, टेबल-टेनिस, टेनिस, रिंग-टेनिस हे खेळ खेळणे तर अशक्य नाही ना ? कौटुंबिक, सामाजिक जबाबदारी पार पाडत असताना मनाचा तोल, संगम राखण्यासाठी योगासनासारख्या व्यायाम प्रकाराचाही स्त्रियांना उपयोग होऊ शकेल. क्वचित इतर खेल सर्वांनाच परवडण्यासारखे नसतील. मात्र रोज टेकडीवर फिरायला जाणे हे अशक्य नाही ना ? दिवसभर कितीही धावपळ झाली तरी चेहऱ्यावरील हास्य लोप पावणार नाही. चैतन्य नाहीसे होणार नाही. उलट कामे करण्यास स्फूर्तीच मिळेल. गह्रातील कर्ती स्त्री जोपर्यंत  खंबीर, धडधाकट आहे तोपर्यंत संसाराचा डोलार कोसळणार नाही. पण साधारणपणे पन्नाशीच्या आसपास स्त्रियांच्या शरीराची कुरबुर सुरू होते. आयुष्याची वयोमर्यादाही आधुनिक काळात वाढलेली आहे. जास्तीत जास्त चांगल्या  गोष्टी साध्य करून सुखसमाधानाने आयुष्य जगण्याचे स्वप्न प्रत्येकाचेच असते. काश्मीर-कन्याकुमारीचा दौरा करण्याची, सहलीला जाण्याची, परदेश दौरा करण्याची इच्छा असते पण.. प्रकृती साथ देत नाही म्हणून सारी स्वप्ने अपुरीच राहतात आणि जीवनात नैराश्य येते, मानसिक ताण वाढतो. घरटंचाई, महागाईने त्रासलेले स्त्रीचे मन उदास बनते. डॉक्टरांची भरमसाठ बिले भरण्यापेक्षा स्वतःच प्रयत्न करून आपल्यातील वैगुण्य, दोष कमी करावा म्हणून कितीजणी मनापासून प्रयत्न करतात !

आज राजकारणापासून पायलट, जज्ज, वकिल, डॉक्टर, इंजिनिअर, कलाकार, खेळाडू आदी पदांवर स्वकर्तृत्वाने स्त्री पोहोचली आहे. ‘समाजभिमुख व्यक्तीत्व’ निर्माण करणे आपल्या हातात आहे. ‘स्त्री’ म्हणून तिच्याकडून असलेल्या आई-वडील, पती, मुले आदीच्या अपेक्षाही आज बदलू लागल्या आहेत. डोंबारणीच्या दोरीवरील क्सरतीपेक्षाही कठिण कसरत स्त्रीला प्रत्यक्ष जीवनात पदोपदी करावी लागते. कारण एक आदर्श गृहिणी, माता, पत्नी म्हणून जगायची तिचीही धडपड सुरूच असते आणि आनंदी निरोगी, स्त्रीच ही कसरत करून समाधाने जगू शकेल व इतरांना जगवू शकेल !