Tag Archives: हापूस

एक हापूस ६०० रुपये

एक हापूस ६०० रुपये

एक हापूस ६०० रुपये

आंब्यांचा सिझन सुरू व्हायला खूप अवकाश आहे. त्याआधीच आंब्याची चव चाखू पाहणार्‍यांना मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये एक डझन हापूस आंबा चक्क सात हजार रुपयांना विकल घ्यावा लागला. याचा अर्थ एका हापूसमागे मोजावे लागले ६०० रुपये! एवढा दर असूनही हापूसच्या पहिल्या चार पेट्यांची विक्री झाली. पुण्यात तर हापूस थेट ‘लिलाव’ पद्धतीने विकण्यात आला. हा ‘राजा’ मात्र गोरगरीबांच्या खिशाला सध्या तरी परवडणार नाही.

आंब्याचा सिझन खरे तर एप्रिलपासून सुरू होतो, पण अनेकांना सिझनपूर्व आंबा खाण्याची इच्छा असते. त्यांच्यासाठी एपीएमसीने खास पुण्यात लिलाव आयोजित केला होता. येथे ४० आंब्यांची पहिली पेटी ११ हजार १११ रुपयांना विकली गेली. रावसाहेब कुंजीर यांनी ती खरेदी करून बोली जिंकली.

पुण्यातील द्राक्ष व आंब्याचे व्यापारी नाथसाहेब खैरे यांनी सांगितले की, आंब्याची बोली लावून ‘मुहूर्त’ करणे व चढ्या भावाने तो खरेदी करणे यामागे प्रसिद्धीचा स्टंट असतो. कधी तर नुकसान सहन करूनही आंबा विकण्याची वेळ येते. या वर्षी आंब्याची आवक अतिशय कमी झाल्याने भाव गगनाला भिडले आहेत. कोकणातील प्रसिद्ध ‘देसाई बंधू आंबेवाले’चे मुख्य कार्यकारी अमर देसाई म्हणाले, गेल्या वर्षी सिझनच्या सुरुवातीला एक डझन आंब्याचा भाव चार हजार ५०० रुपये एवढा होता. या महागड्या आंब्याची पेटी खरेदी करणे हे सध्याच्या काळात प्रतिष्ठेचे लक्षण मानले जात आहे. हवाहवासा वाटणार्‍या हापूसचा घमघमाट अनुभवण्यासाठी आणखी काही दिवस मुंबईकरांना वाट पाहावी लागेल.