Tag Archives: हिंदुस्थान

हेल्पर्स ऑफ दी हॅण्डिकॅप्ड

अपंग व्यक्ती पाहिली तरी किंवा आपण एखाद्या अपंग व्यक्तीबद्दल सांगत-ऐकत असलो तरी आपल्या मनात त्या व्यक्तीबद्दल एक वेगळी भावना निर्माण होते काही जण अपंग व्यक्ती दिसली की तिच्यापासून लांब राहतात. त्यांना मदत करणं तर दूरच. तुम्हाला माहिती का, अपंग व्यक्तीसुद्धा कोणत्या कामात मागे नाहीत. हेच बघा ना, स्वतःची संस्था असणारी स्वतःची पतपेढी, गॅस एजन्सी, मोबाइल, फास्ट फूड, व्हॅन, वर्कशॉप, शेती इत्यादी सर्व पसारा अपंग बंधू-भगिनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळतात. हे सर्व कसे घडते ?तर या सर्वांना स्फूरी देणाऱ्या “For us too the Sky is the limit” असा विश्वास त्यांच्या मनात निर्माण करणाऱ्या संस्थेच्या अध्यक्षा ‘नसीमा दीदी’ हुरजूक या स्वःत पॅराप्लेजिक आहेत.

आपल्या सगळ्यासारखी हसणारी, बागडणारी. तसेच विविध खेळांची आवड असणारी. त्यात बक्षिसे पटकाविणारी नसीमा सांस्कृतिक कार्यक्रमात स्टेज कोसळून पडते. पाठीला इजा होते. तीन वर्षे यावर डॉक्टरी इलाज चालतो. पण उपयोग होत नाही. १६ व्या वर्षी मात्र कमरेच्या खालचे संपूर्ण सेन्सेशन नाहीसे होते. त्यानंतर तिला मिरजेला इलाजासाठी नेले असता पाठीच्या कण्यातील एक मणका चेपला गेला हे डॉक्टर सांगतात. त्यावर ऑपरेशनही होते पण दुर्दैवाने त्याचा काही उपयोग होत नाही.

नसीमा दीदीबद्दल सांगावे तेवढे कमीच आहे. त्या नॅशनल लेव्हलवर अपंगाच्या स्पर्धेत हिंदुस्थानाचे प्रतिनिधित्व करत लंडनला गेल्या. तेथे ४८ देशांतील हसणारे, बागडणारे अपंग पाहून त्यांना आश्चर्य वाटले. दीदींनी नोकरीस सुरुवात केली. या पैशातून अपंगाचे पुनर्वसन त्यांनी सुरू केलं. १९८४ साली दीदींनी लावलेले हे छोटेसे रोपटे अपगांना ट्राय सिकल, व्हीलचेअर पुरवणे. आवश्यक असल्यास सर्जरी करणे या सर्व गोष्टी करण्यासाठी भरपूर पैसा, जागा सर्व काही आवश्यक होते. हे सगळे अवघड होते. परंतु मदतीचे किती तरी हात पुढे आले. रस्त्यात खूप अडचणी आल्या. संकटे सुद्धा आली. परंतु दीदी झगडत राहिल्या आणि आता त्यांच्या रोपाचा वटवृक्ष कोल्हापूर, सिंधदुर्ग, पुणे असा पसरलेला दिसून येतो.
कोल्हापूर येथे कदंबवाडीला संस्थेचे वर्कशीप आहे. त्यात अपंगाना लागणारी व्हीलचेअर, कॅलिपर्ससोबत इतरही सर्व फर्निचर बनवले जाते. हे सगळं अविनाश कुलकर्णी बी.ई. झालेले स्वतः पॅराप्लेजिक असलेले गृहस्थ हे वर्कशॉप सांभळतात.

काही काळापूर्वी ८ व ९ रोजी त्या संभाजीनगर येथे आल्या होत्या. येथील मतिमंद मुलांना ‘क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट नसल्यामुळे मतिमंदत्वाचे प्रमाणपत्र मिळत नाही. हे ऐकून त्या व्यथित झाल्या.दीदींना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे. ‘आऊटलूक’तर्फे देण्यात येणारा ‘स्पीक आऊट पुरस्कार, डॉ. हेडगेवार पुरस्कार आणि यासारखेच अन्य सुमारे १७-१८ पुरस्कार त्यांना मिळविलेले आहेत.

बंगळूरच्या अपंग सेवासंस्थेचे पॅराप्लेजीक झालेले बाबुकाका दिवाण, हेलन केअर यांच्यासारख्याकडून प्रेरणा घेऊन त्यांनी संस्थेच्या विकासाला नवी दिशा दिली. दुर्दैवी माणसांच्या जीवनात आनंद निर्माण करणारी नसीमादीदीची ही संस्था जाती, धर्म, राष्ट्र या संकुचित क्षेत्रात बंदिसत नाही. नियतीने ज्यांचे जीवन उद्ध्वसत केले, अशा क्रूर नियतीचा काही प्रमाणात पराभव करण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत.
अपंग स्वतःच्या वेदनेने, दुःखाने खचलेले असतात. समाजाने त्यांच्या मार्गात अडचणी उभ्या न करता त्यांना मदतीचा हात द्यावा, अशी तळमळ दीदींच्या हृदयात आहे.

सुखदुःखाचे घास दे, परी पचवायची शक्ती दे.
पराभवाचे घाव झेलता, हसवायची युक्ती दे.
अशी प्रार्थना दीदी आणि त्यांचे अपंग बंधू-भगिनी रोज देवाजवळ करतात. आपण सगळ्यांनी त्यांना यश येवो. अशी देवाचरणी प्रार्थना करू.