Tag Archives: हृदयविकार

अभिनेते रुस्तम-ए-हिंद दारासिंग यांचे निधन

रुस्तम-ए-हिंद दारासिंग

ज्येष्ठ अभिनेते आणि ‘रुस्तम-ए-हिंद’ दारासिंग यांचे आज राहत्या घरी सकाळी साडेसात वाजता निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. गेल्या पाच दिवसांपासून ते मृत्यूशी झुंजत होते. बॉलिवूदमधला एक ‘सशक्त अभिनेता’ आज देवाघरी गेला.

दारासिंग यांना ९ जुलैला हृदयविकाराचा झटका आला होता व त्यांना कोकीळाबेन हॉस्पीटलमध्ये आयसीयूत दाखल करण्यात आले होते. पण त्यांचे शरीर औषधोपचाराला फारसा प्रतिसाद देत नव्हते आणि त्यांची प्रकृती हळूहळू ढासळतच जात होती. काल तर त्यांना ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे डॉकटरांचे प्रयत्न संपले. जेव्हा डॉक्टरांनी सांगितले की त्यांना चमत्कारच वाचवू शकेल तेव्हा त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना घरी परत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. अखेरच्या क्षणी कुटुंबासोबत राहण्याची इच्छा दारासिंग यांनी व्यक्त केली होती. त्याप्रमाणे त्यांना घरी नेण्यात आले. पण दुर्दैवाने कुठलाच चमत्कार घडला नाही आणि सकाळी साडेसात वाजता त्यांची प्राणज्योत मावळली. कोकीळाबेन हॉस्पीटलमधले सीओओ डॉ. राम नारायण यांनी त्यांच्या निधनाची बातमी दिली.

चित्रपटसृष्टीत दारासिंग यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले जात आहे. अनेक दिग्गज कलाकारांनी भावना व्यक्त केली की, दारासिंग यांची शरीरयष्टी पीळदार होती. ते अंगपिंडाने भक्कम होते पण स्वभावाने अत्यंत मृदू, संवेदनशील आणि सहृदय होते. आज दुपारी दोन वाजता दारासिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दारासिंग यांचे नाव आठवताच टीव्हीवरील रामायणातला ‘हनुमान’ आपल्या डोळ्यासमोर प्रकट होतो. पण चित्रपटसृष्टीतही त्यांनी १९६५ ते २००७ या दशकांच्या कारकीर्दीत आपला ठसा उमटविला होता. तब्बल १२० हिंदी आणि पंजाबी चित्रपटात त्यांनी काम केले आहे. ‘किंग कॉंग’ आणि ‘फौलाद’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिका फार गाजल्या. अलिकडच्या काळात ‘दुल्हन हम ले जाएंगे’, ‘कल हो ना हो’, ‘जब वुई मेट’ अशा चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला होता. ‘जब वुई मेट’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. निर्माता आणि दिग्दर्शकाची भूमिका दारासिंग यांनी समर्थपणे पेलली होती. ‘मेरी आत्मकथा’ हे दारासिंग यांच्यावर लिहिलेले आत्मचरित्र अत्यंत रंजक व प्रेरणादायी आहे.