ताम्हिणी घाट नवे अभयारण्य

ताम्हिणी घाट

आता ताम्हिणी घाटाला दुर्मिळ वनौषधी, वैविध्यपूर्ण पक्षी, कीटक आणि बिबट्यासह इतर वन्यप्राण्यांच्या वास्तव्यामुळे अभयारण्याचा दर्जा मिळणार आहे. अभयारण्याचा प्रस्ताव पुणे वन विभागाने तयार केला आहे आणि येत्या राज्यस्तरीय वन्यजीव मंडळाच्या बैठकीत ‘अभयारण्य’ यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

कोणत्याही ऋतूत रिफ्रेश होण्यासठी निसर्गरम्य ताम्हिणी घाटात जाणार्‍यांची संख्या खूप मोठी आहे. ताम्हिणी ही एक हक्काची प्रयोगशाळा तेथील वनसंपदा आणि वनजीवांचे संशोधन करणार्‍या निसर्गप्रेमींसाठी आहे. त्यामुळेच १९९९ साली ‘ताम्हिणी सुधागड अभयारण्य’ हे घोषित करण्यासाठी वन विभागाने सरकारला प्रस्ताव पाठविला होता. त्यावेळी २२८.२४ स्क्वेअर किलोमीटर हा पुणे आणि रायगड जिल्ह्यातील परिसर आरक्षित करण्याचा विचार होता. मात्र, या परिसरात गावकरी रहात असल्यामुळे त्यांनी अभयारण्याला विरोध केला. ताम्हिणीच्या मध्यवर्ती भागात जैवविविधता आहे व याला संरक्षण देण्या हेतू वन विभागाने आता नव्याने प्रस्ताव तयार करुन क्षेत्रफळ कमी केले आहे.

‘ताम्हिणी घाटाला महत्त्व पश्चिम घाटातील भीमाशंकर अभयारण्य, कोयना, चांदोली अभयारण्यएवढेच आहे. हा परिसर जैववैविध्याने नटलेला आहे व याला संरक्षण देण्याची गरज आहे. त्यामुळे या परिसरातील गावांना वगळले आहे आणि ३८ स्क्वेअर किलोमीटरचा जो वनाच्छित परिसर आहे त्याचा अभयारण्याच्या नव्या प्रस्तावात समावेश केला आहे. गावकर्‍यांचा त्यामुळे विरोध होणार नाही,’ असे पुणे विभागाचे मुख्यवनसंरक्षक नितीन काकोडकर म्हणाले.

‘सुधागड वनक्षेत्रही या प्रस्तावात घेतले होते. पण यावेळी ते वगळले असून, सुधागड अभयारण्याचा स्वतंत्र प्रस्ताव रोहा वनविभागातर्फे तयार करण्यात येणार आहे. हा प्रस्ताव राज्याच्या वन्यजीव मंडळाकडे पाठविला आहे व त्यांच्या बैठकीत हिरवा कंदील मिळेल,’ असेही त्यांनी सांगितले.