तरूण मनुष्य आणि त्याचे मांजर

एका मुलाचे एक मांजर होते, त्याजवर त्याची इतकी प्रीती होती की, त्या मांजराची जर स्त्री होईल तर तिच्याशी आपण लग्न करू असे तो म्हणत असे.

हे त्याचे म्हणणे ऐकून, देवाने त्या मांजराची एक सुंदर स्त्री केली व मुलाने तिच्याशी आपले लग्न लाविले. एके दिवशी रात्री, ती उभयतां जेवावयास बसली असता, त्या स्त्रीने स्वयंपाकघरांत उंदराचा शब्द ऐकला. तो शब्द कानी पडतांच आपले ताट बाजूस सारुन ती एकदम स्वयंपाकाघरांत गेली आणि त्या उंदरास तिने ठार मारिले.

हे पाहून, तिचे रूप पालटले तरी तिच्या मूळ स्वभावात कांही पालट झालेला नाही, याबद्दल देवास तिचा मोठा राग आला. त्याने एका क्षणांत तिला पूर्ववत्‌ मांजरीचे स्वरूप दिले.

तात्पर्य:  वेषांत बदल झाला तरी स्वभाव बदलणे शक्य नाही.