तीर्थक्षेत्रे

जेजुरी येथील खंडोबाचे मंदिर

महाराष्ट्राच्या वास्तुशिल्प परंपरेत डोंगर, शिखरे किंवा महत्त्वाची धार्मिक स्थाने यांवर बांधलेल्या देऊळवाड्यांचे स्थान फार महत्त्वाचे आहे.

धार्मिक वास्तू व मंदिरे यांचा विचार करताना प्रारंभीच्या कालखंडात राष्ट्रकूटांच्या वेरूळ व अजिंठा येथील वास्तूंचा विचार होतो. सातव्या व आठव्या शतकांत कोरलेल्या या लेण्यांची जागा शेव पंथीयांचे एक महत्त्वाचे धार्मिक स्थान होते. नंतरच्या सतराव्या व अठराव्या शतकांतील मराठा व पेशवाई अमदानीत राजेरजवाडे व सरदारांनी मंदिरवास्तुकलेला सक्रीय प्रोत्साहन दिले. त्यामुळे अनेक मंदिरांवर या कालखंडात निर्माण झालेल्या मराठा वास्तुकलेचा ठसा स्पष्टपणे दिसून येतो.

मराठा वास्तुकलेची जडणघडण अनेक वास्तुपद्धतींच्या सम्मिश्रणातून झालेली आहे. उत्तरेकडील वास्तुशिल्पांत भुवनेश्वर, कोणार्क, खजराहो वगैरे मंदिरसमुच्चय त्या मंदिरांचे आकार व वास्तुशिल्पकलेमुळे प्रसिद्ध आहेत. त्या उलट, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या ठेविले अनंते तैसेची रहावे । चित्ती असो द्यावे समाधान ॥ या अल्पसंतुष्ट राहण्याच्या उपदेशामुळे महत्त्वाच्या मंदिरांची वास्तुशिल्पकलाही खास उल्लेखनीय नाही. शिवाय मराठ्यांना व नंतरच्या पेशव्यांना राजकीय स्थैर्य व शांतता नसल्यामुळे मोठी मंदिरे किंवा इमारती बांधण्याच्या योजना हाती घेता आल्या नाहीत. या मंदिरावर उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय व प्रादेशिक स्थानिक लोककलांचा प्रभाव पडलेला दिसतो.

छत्रपती शिवाजी महाराजांचा व नंतर पेशवे व मराठे सरदार यांचा काळ मोगल, निजाम व इतर अनेक शत्रूंशी लढण्यातच गेला व या अस्थिर परिस्थितीचे प्रतिबिंब आमच्या जेजुरी, शिखर-शिंगणापूर, पुण्यातील पर्वती वगैरे मंदिरांच्या बाहेरच्या दगडी तटबंदीच्या स्वरूपात दिसून येते. परंतु या ओबडधोबड दगडी तटबंदीच्या आत मात्र सुंदर, सुबक, प्रादेशिक शैलातील डौलदार मंदिरे आहेत. मराठी वास्तुकलेला उत्तर भारतीय, यादव, भूमिज व प्रादेशिक वास्तुकलेचा वारसा लाभला आहे.

पेशवाईच्या उत्तर कालखंडात थोडे स्थैर्य लाभल्यावर नागपूर, पुणे, वाई, नाशिक वगैरे शहरांतून मंदिरांचे बांधकाम व त्यांच्या सुधारणेचे काम चालू असे. त्यासाठी उत्तर भारत, पूर्व भारत किंवा ओरिसा व दक्षिणेकडील स्थपतींना पाचारण करण्यात येई. राजपूत दरबारांतील अनेक स्थपती पेशव्यांच्या दरबारी असत. भौगोलिक परिस्थित्यनुरूप नागपूरकडे नागपूरकर भोसल्यांच्या छत्राखाली नागपूर शैलीचा उगम झाला.

मराठी देउळवाडा
मराठी देऊळवाड्याचे स्वरूप खास महाराष्ट्रीय शैलीचे आहे. अशा देऊळवाड्याची काही ठळक वैशिष्टये असून बाहेरच्या तटबंदी व्यतिरिक्त मुख्य महाद्वार, पायऱ्या, दीपमाळा, देऊळ व स्नानाचे घाट किंवा तळे अशी त्याची प्रमुख अंगे आहेत .

पायर्‍या व स्मारक द्वारे व कमानी
जेजुरीचा खंडोबा वगैरे सारख्या डोंगरावरील देवळांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक दगडी पायऱ्या, उजेडासाठी दीपमाळा व अनेक कमानी उभारण्याची प्रथा आहे. भक्ती संप्रदायाप्रमाणे भाविकांना देवळापर्यंत नेणाऱ्या पायऱ्या व कमानी बांधणे हे दात्याला प्रत्यक्ष शिखर उभारण्याहूनही जास्त पुण्यदायी गणले जाते. यामुळेच अनेक देवळांना भक्तांनी पायऱ्या बांधल्या आहेत.

नगारखाना, दीपमाळा यातूनपायऱ्या मुख्य देऊळवाड्याच्या महाद्वारापर्यंत नेलेल्या असतात. देऊळवाड्याच्या तटबंदीमुळे जसे आतल्या मूर्ती, दागिने व इतर मौल्यवान वस्तुंचे रक्षण होते तसेच आतल्या बाजूला असलेल्या ओवऱ्यांना मजबूत आधारही मिळतो.

सभामंडप, अंतराळ व गाभारा किंवा गर्भगृह हे प्रत्यक्ष देवळाच्या वास्तूचे तीन घटक आहेत. उत्कृष्ट कोरीव काम असलेले खांब किंवा पितळेच्या पत्र्याने मढवलेले दगडी खांब सभामंडपासाठी वापरतात. लाकडी सुरूचे खांब राजपूत व गुजराती कारागिरांनी अठराव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात महाराष्ट्रात उपयोगात आणले.

यात्रा
उत्सव, पूजाअर्चा, मिरवणुका, भजन, पूजन वगैरे भक्तिमार्गी परंपरा महाराष्ट्रातील बहुतेक महत्त्वाच्या देवळांशी निगडित आहेत. काही नवसांच्या पूर्तीसाठी किंवा आशीर्वादप्राप्तीसाठी अनेक लोक पंढरपूरसारख्या यात्रेला नित्यनियमाने जातात. पंढरपूरची यात्रा आषाढी एकादशीला आणि कर्तिक व माघ महिन्यात होते. तर जेजुरीची यात्रा चैत्री व पौष पौर्णिमेला आणि सोमवती अमावास्येला असते. काही हजारांपासून लाखापर्यंत भाविक यात्रेला व नंतरच्या जत्रेला जमतात. उत्सवाचा भाग म्हणून मंदिरासमोर किंवा पायथ्याशी जत्रा भरते. जत्रेत फुले, अत्तर, गुलाब, हळद, कुंकू, खेळणी, पितळी पूजेचे सामान, मूर्ती, बैलांसाठी झुली व दागिने अशा अनेक वस्तूंची तात्पुरती दुकाने बसतात.