उंदीर आणि बैल

एक उंदीर एका बैलाच्या पायास चावला आणि बिळात जाऊन लपून बसला. झालेल्या वेदनेने बैल इतका वेडावून गेला की, त्याने आपले नाक फेंदारले आणि शिंगे वर करून, आपला शत्रू कोण आहे, हे तो पाहू लागला. पण शत्रू कोठे दिसेना म्हणून तो अधिकच चवताळला असता, तो उंदीर हळूच बिळाच्या तोंडाशी येऊन त्याजकडे पाहून हसू लागला. तो बैलास म्हणाला, ‘अरे, तुझा गर्व व्यर्थ आहे. तुझी शिंगे आणि तुझ्या लाथा यांचा येथे आता काय उपयोग आहे. सांग बरे ? मी यःकश्चित्‌ उंदीर असता माझा जर तुला प्रतिकार करता येत नाही, तर तुझ्या शक्तीचा काय उपयोग ?’

तात्पर्य:- ज्याला शत्रू नाही असा प्राणी नाही, आणि शत्रू कितीही लहान असला तरी त्याजपासून आपणास काही उपद्रव होणार नाही, असे कोणी समजू नये.