उंदीर आणि बेडूक

एक उंदीर आणि एक बेडूक यांची मोठी मैत्री होती. बेडूक उंदराच्या बिळात जाऊन त्याचा पाहुणचार वरचेवर घेत असे. त्याने उंदरासही आपल्या घरी येण्याचा पुष्कळ वेळा आग्रह केला, परंतु वाटेत पाणी असल्यामुळे व आपणास पोहता येत नसल्यामुळे आपल्याच्याने येववत नाही असे सांगून उंदराने त्याच्या घरी जाण्याचे टाळले. पुढे एके दिवशी बेडकाने उंदरास फारच आग्रह केल्यामुळे तो त्याजबरोबर त्याच्या घरी जाण्यास निघाला. उंदीर पाण्यात बुडू नये म्हणून, त्याचा एक पाय बेडकाने आपल्या मागल्या पायस बांधला व ते दोघेही पाण्यातून जाऊ लागले. वाटेत, बेडकाच्या मनात असे आले की, उंदरास पाण्यात बुडवून मारून टाकावे, म्हणजे त्याने आपल्या बिळात जो अन्नाचा साठा करून ठेवला आहे, तो सगळा आपणास मिळेल. मग त्याने एकदम पाण्याच्या तळाशी बुडी मारली, तेव्हा उंदीर मोठयाने ओरडला व धडपड करू लागला. ती गडबड, आकाशातून एक घार चालली होती, तिच्या कानी पडताच, ती खाली उतरली व उंदरास तोंडार धरून आकाशात गेली. उंदराच्या पायस बेडकाने आपला पाय बांधला होता, त्यामुळे उंदराबरोबर तोही पकडला गेला व शेवटी घारीच्या भक्षस्थानी पडला !

तात्पर्य:- विश्वासघातकी मनुष्यास योग्य शिक्षा मिळाल्याशिवाय रहात नाही.