वादाचा शेवट

अमेरिकेतील वॉशिंग्टन शहरामधील रस्त्यावर दोघा गृहस्थांमध्ये कडाक्याचा वाद चालला होता. वादाचा विषय होता, शरीराच्या मानाने माणसाचे पाय किती लांब असावेत ?’वाद घालणाऱ्या त्या दोघां गृहस्थांमध्ये काही केल्या एकमत होईना. त्याच वेळी रस्त्याने घोड्यावरुन जाणारे त्या वेळचे अमेरिकेचे अध्यक्ष लिंकन यांच्या कानी तो वाद गेला.

घोडा थांबवून त्यांनी विचारलं, ‘कसला वाद चाललाय ?’दोघांनी एका सुरात सांगितलं, ‘प्रश्न असा आहे की, शरीराच्या मानानं माणसाचे पाय किती लांब असावेत ?’

या नसत्या विषयावर वादंग माजवून वेळ घालविणाऱ्या त्या रिकामटेकड्या गृहस्थांबद्दल खरं तर लिंकनना कीव आली, पण बाह्यता: तसं न दाखवितान एवढंच काय पण चेहरा गंभीर करुन ते मुद्दाम म्हणाले, ‘फ़ार महत्त्वाचा प्रश्न तुम्ही चर्चेला घेतलेला आहे. हा प्रश्न सुटला नाही, तर जगात अशांतता माजून ठिकठिकाणी रक्ताचे पाट वाहण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच स्वत: मीही गेली अनेक वर्षे या गंभीर समस्येवर विचार करकरुन अखेर अशा निर्णयाला आलो आहे की, माणसाचे पाय मुख्य देहापासून शक्यतो जमीनीपर्यंत पोहोचतील, एवढे तरी लांब असावेत.’

लिंकन यांच्या या चिमटेदार उत्तरानं ते दोन्हीही गृहस्थ मनोमन ओशाळून आपापल्या वाटेने निघून गेले.