वाघूळ, काटेझाड आणि पक्षी

एकदा एक वाघूळ, एक काटेझाड आणि एक समुद्रपक्षी या तिघांनी मिळून भागीने व्यापार करण्याचा विचार केला. वाघुळाने भांडवल घालावे आनि हिशेब ठेवावे असे ठरले, काटेझाडाने व्यापारासाठी पुष्कळसे कापड आणले आणि समुद्रपक्ष्याने पितळ आणली. हा सगळा माल एका नावेत घालून ते समुद्रातून प्रवास करीत असता, मोठे वादळ होऊन नाव बुडाली. ते तिघेही मोठया नशिबाने वाचले. त्या दिवसापासून, वाघुळाने ज्यांच्याकडून भांडवलाची रक्कम उसनी आणली होती, त्यांना चुकविण्यासाठी ते दिवसा बाहेर पडेनासे झाले; आपले गेलेले कापड पुनः मिळवावे म्हणून, जाणारायेणाऱ्यांचे कपडे ओढून घेण्याचा क्रम काटेझाडाने चालू ठेवला आणि आपली पितळ मिळाली तर पहावी म्हणून समुद्रपक्षी समुद्रात सारख्या बुडया मारीत राहिला आहे.

तात्पर्य:- एखादयाचे फार मोठे नुकसान झाले असता त्याची आठवण तो कधी विसरत नाही.