वाईट वाटले, पण…..

मी व माझी आई परभणीहून नंदीग्राम एक्स्प्रेसने औरंगाबादला येत होतो. जालन्याला एक कुटुंब आमच्या डब्यात चढलं. त्यांनी सामान लावलं. बसण्यापूर्वी त्यांनी तिकीट वर काढून ठेवण्यासाठी खिशात हात घातला, तर ध्यानात आले, की पाकीट नाही. पाकीट मारलं गेलं होतं. ते एकदम बैचेन झाले. त्यांची पत्नी रडू लागली.

आम्ही त्यांना, काय झाले ? असं विचारलं.
‘पाकीट मारलं गेलं. त्यात तिकीट होतं, असं त्यांनी सांगितले.
‘कुठे जायचं,’ आम्ही विचारलं.
‘मुंबईला,’ असं त्यांनी सांगितलं.

‘मी आजच सकाळी मुंबईहून जालन्याला आलो व कुटुंबाला घेऊन लगेच परत मुंबईला निघालो,’ असंही त्यांनी सांगितलं.
त्यांच्यासोबत आठ महिन्यांची मुलगी होती. काय करावं ? हे त्यांना कळत नव्हतं. तुमचा कुणी औरंगाबादला मित्रं आहे का ? त्यांना फोन करून तिकीट काढायला सांगा,’ असं एकानं सुचवलं.

त्यात एकाने सांगितले, ‘आधी तुम्ही ‘टीसी’ला सांगा.’
त्यांनी ‘टीसी’ला सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर ‘टीसी’ म्हणाले, ‘आप औरंगाबाद को उतरकर तिकीट निकाल लिजिए.’
‘टीसी निघून गेले. आमच्या बाजूला एक कुटुंब बसलं होतं. तेही जालन्यालाच चढलं होतं. त्यांनाही मुंबईला जायचं होतं. त्यांचं चार बर्थचं रिझर्व्हेशन होतं.

त्यांनी या अडचणीत सापडलेल्या कुटुंबाला बसायला जागा दिली. औरंगाबादला नातेवाईकांशी संपर्क साधला. तिकीट काढता येतं का, त्यासाठी प्रयत्न केलं, पण त्याला यश आलं नाही. ओळख नसतानाही त्यांनी हे प्रयत्न केले होते.

शेवटी काहीही उपाय नसल्याचं पाहून त्या व्यक्तीनं औरंगाबादला उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांना औरंगाबादला कुणी ओळखत नव्हते. मग काहीतरी व्यवस्था करून ते मागून येणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसने मुंबईला गेले. आपण त्यांना काहीही मदत करू शकलो नाहीत, याचं मात्र मला वाईट वाटलं.