वाकडे झाड

एका अरण्यात इमारतीस उपयोगी पडणाऱ्या झाडांची लागवड केली होती. ती सगळी झाडे अगदी उंच आणि सरळ वाढली होती. त्यातले फक्त एक झाड मात्र वाकदेतिकडे आणि इमारतीस उपयोगी न पडणारे असे होते. त्या झाडाकडे पाहून बाकीची झाडे मोठमोठयाने हसून वेडेवाकडेपणाबद्दल त्याची थट्टा करीत असत. त्या झाडाच्या मालकाने एके दिवशी आपल्यासाठी एक नवे घर बांधण्याचा विचार ठरवून , त्या कामी ज्यांच्या लाकडांचा उपयोग होईल, अशी सगळी झाडे तोडण्याचा आपल्या नोकरास हुकूम केला. त्याप्रमाणे, नोकरांनी, ते वाकडे झाड सोडून बाकीची सगळी झाडे तोडून टाकली !

तात्पर्य:- ज्या गुणामुळे नुकसान मात्र होण्याचा संभव आहे, तो गुण अंगी नसला तर त्याबद्दल वाईट वाटण्याचे काही कारण नाही.