वळणातला वासू

सुनंदाबाईनी रस्त्यानं जाणाऱ्या भाजीविक्याला घरी बोलावलं व त्याच्याकडून भाजी विकत घेतली. त्या त्याच्याकडून भाजी विकत घेत असता, त्यांचा सात-आठ वर्षांचा मुलगा वासू, याचं लक्ष भाजीवाल्याच्या टोपलीत एका बाजूला असलेल्या गावठी बोरांवर खुळलं होतं. ही गोष्ट लक्षात येताच, तो भाजीवाला वासूला म्हणाला, ‘बाळ ! तू मुठभर बोरं घे बरं का या टोपलीतून?’
वासू – छे छे ! तुमच्या टोपलीत मी हात घालणार नाही.

भाजीवाला – का ? आवडत नाहीत का बोरं तुला ?

वासू – छे छे ! असं कसं होईल? चांगलीच आवडतात, पण तुमच्या टोपलीत मी हात घालून घेणार नाही.वासूच्या या वागण्यावर बेहद्द खूश झालेल्या त्या भाजीवाल्यानं स्वत: मूठभर बोरं त्या टोपलीतून काढून त्याला दिली व ‘शाब्बास ! तू फ़ार चांगल्या वळणातला मुलगा आहेस बरं का ?’ असं म्हणून तो तिथून निघून गेला.

भाजीवाला निघून जाताच सुनंदाबाईंनी वासूची पाठ थोपटली व त्या त्याला म्हणाल्या, ‘वासू ! त्या भाजीवाल्यानं तुला तुझ्या मुठीनं बोर घ्यायला सांगितली असतानाही तू तशी घेण्याचा अधाशीपणा केला नाहीस; तर तू त्यालाच ती द्यायला सांगितलीस हे पाहून खरोखरचं आनंद झाला.

यावर वासू म्हणाला, ‘आई, त्यात आनंद वाटण्यासारखं काय आहे ? मी माझ्या मुठीनं बोरं घेतली नाहीत, कारण त्या भाजीवाल्याचे मूठ माझ्या मुठीच्या पाच-सहा पट मोठी होती. तेव्हा त्यालाच त्याच्या मुठीनं बोरं द्यायला सांगण्यात माझा फ़ायदा नव्हता का ?’