वांव मासा आणि साप

वांव या नांवाचा एक मासा आहे. त्याचा आकार सापासारखा असतो. त्या जातीचा एक मासा एकदा एका सापास म्हणाला, ‘अरे, तुझा आणि माझा आकार इतका सारखा आहे की, त्यावरून तुझे आणि माझे खचित काही तरी नाते असले पाहिजे असे मला वाटते. मग लोक मलाच तेवढे पकडून नेतात आणि तुझ्या वाटेस कोणीही जात नाही, याचे कारण काय बरे ?’ साप उत्तर करतो, ‘गडया, याचे कारण असे की, माझ्या वाटेस तर जात नाहीतच, परंतु मीच उलट त्यांना अशी शिक्षा करतो की, तिची त्यांना चांगलीच आठवण रहावी.’

तात्पर्य:- त्रास देणाऱ्या माणसास नमुन राहणे म्हणजे त्यास त्रास देण्याच्या कामी उत्तेजन होय.