विहंगावलोकन

लोकजीवन

१९८१ च्या जनगणनेनुसार राज्याची लोकसंख्या ६२७ लाख असून लोकसंख्येच्या दृष्टीने त्याचा देशात तिसरा क्रमांक लागतो. लोकसंख्येची दाटी चौ. किमीला २०४ इतकी असून सबंध देशाचा विचार करता ती काहीशी कमी आहे. नागरीभवनाच्या दृष्टीने राज्य पहिल्या क्रमांकावर असून त्यातील ३५% लोक शहरात राहतात; मात्र यापैकी ४०% लोक एकट्या मुंबईत राहतात. राज्यात दशलक्षावर लोकसंख्या असलेली मुंबई, पुणे व नागपूर ही तीन महानगरे असून त्यांच्या लोकसंख्येत झपाट्याने भर पडत आहे. मध्यम लोकसंख्येवर शहरांची त्यामानाने बेताने वाढ होत असून छोट्या शहरांची वाढ जवळजवळ खुंटलीच आहे. काही तर रोडावत आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील नागरीभवनाच्या प्रक्रियेला अत्यंत अनिष्ट वळण लागले असून त्यात संतूलन निर्माण करण्यासाठी मध्यम व छोट्या शहरांची वाढ प्रयत्नपूर्वक घडवून आणणे आवश्यक आहे.

कामगार वर्गापैकी जवळजवळ तीन-चतुर्थांश लोक शेतीव्यवसायात गुंतलेले आहेत. त्यातदेखील राज्यात शेतमजुरांचे प्रमाण बरेच मोठे आहे. इतकेच असूनही शेती उत्पादनांपासून निघणारे उत्पन्न राज्यातील एकूण उत्पान्नाच्या फक्त ४३% च आहे. उलट उद्योगधंद्यात केवळ १६% लोक गुंतले असूनही त्यापासून ३८% उत्पन्न मिळते.

राज्यातील २०% हून थोडेसे अधिक लोक अनुसूचित जाती व जमातींचे आहेत. पूर्व विदर्भ टेकड्या (गोंड), मेलाघाट (कोरकू), सातपुड्याच्या पायथ्याजवळील खानदेश (भिल्ल) आणि सह्याद्रीचा उत्तर भाग ( वारली व कातकरी ) हे प्रमुख आदिवासी प्रदेश आहेत. लोक प्रामुख्याने हिंदू असले तरी अल्पसंख्यांक जमातीदेखील पुष्कळ आहेत; त्या विशेषतः शहरात आढळतात.

ऐतिहासिक काळापासून चालत आलेल्या परंपरा प्रादेशिक अस्मिता निर्माण करण्यास पोषक ठरतात. फार प्राचीन काळापासून सह्याद्रीच्या भिंतीमुळे महाराष्ट्राच्या इतर भागापासून अलग झालेला कोकणचा किनारी भाग समुद्राकडेच आकर्षित झालेला असून सागरी व्यापारसंबंध प्रस्थापित करण्यात, ठाणे, चौल, बायझांटियस (विजयदुर्ग) आणि इतर बंदरे झपाट्याने पुढे आली आणि तशीच काळाच्या ओघात त्यांच्या प्रगतीला ओहोटीही लागली. सोपारा-कल्याण-जुन्नर-पैठण यासारख्या अरुंद आणि दुर्गम खिंडीतून जाणाऱ्या व्यापारी मार्गांनी किनारी आणि अंतर्गत भाग जोडले गेले होते. उत्तर कोकणचा भाग गुजरात आणि उत्तर हिंदुस्थान यांचे प्रवेशद्वार होते. येथे गाव हे वाड्या किंवा पाड्या एकत्र येऊन बनलेले असते पुष्कळदा वाड्यातील वस्ती, व्यवसाय, जात, धर्म यानुसार एकत्र आलेली असते आणि वाड्या डोंगरापायथ्याशी वसलेल्या असतात. वाड्यातही घरे एकत्र असतातच असे नाही. कित्येकदा घरे सुटी असून आजूबाजूला आंबा, फणस यासारख्या फळझाडांचे परसू असते. त्यांचा काहीसा एकलकोंडेपणा आणि अपुरी अंतर्गत वाहतुक यामध्येच त्यांचे बरेचसे प्रश्न सामावले आहेत.

पश्चिमेला सह्याद्रीच्या रांगेने, उत्तरेला विंध्यासातपुडा या दोन डोंगर रांगानी व पूर्वेला बस्तरच्या डोंगराळ प्रदेशाने बंदिस्त झालेला देश भाग आग्नेयेच्या बाजूने खुला असल्यामुळे उत्तरेपेक्षा दक्षिणेकडून होणारा सांस्कृतिक प्रभाव अधिक होता. त्यामुळेच तिकडील संस्कृती व देशावरील संस्कृती यांचा मिलाफ झालेला आढळतो. खांडवा-बऱ्हाणपूर खिंडीतून उत्तर हिंदुस्तान जोडले असल्यामुळे त्यातूनच उत्तरेकडून व्यापार‌उदीम आणि लष्करी मोहिमा देशावरील दऱ्या-खोऱ्यात येऊन पोचल्या. देश हा पाणवठ्याभोवती वसलेल्या गांवांचा प्रदेश आहे. या गावांचे वैशिष्ट्य म्हणजे दगडी भिंती आणि धाब्याच्या छपरांची घरे हे होय. यातील मोठी गावे शेतीमालाच्या बाजारपेठेची ठिकाणे म्हणून विकसित झाली आहेत. पठाराच्या शुष्क आणि अवर्षणप्रवण तसेच दुष्काळग्रस्त मध्य भागात धनगर व पशुपालन करणाऱ्या इतर जमाती राहतात.

सह्याद्री हा राज्याचा प्राकृतिक कणा व आर्थिक विभाजक आहे. मराठी राज्य भरभराटीच्या शिखरावर असताना डोंगरभाग विशेषत्वाने नांवारूपाला आला. डोंगर सोडांच्या उभ्या कडा व त्यांच्या टोकांवर असलेले डोंगरी किल्ले यामुळे या भागांच्या शृंगारात भर पडली. जंगलसंपत्ती, वन्य-प्राणीजीवन आणि त्यांच्याशी निगडित असलेले आदिवासी जीवन हळूहळू लुप्त पावत असून सह्याद्रीची दुर्गमताही कमी होत आहे. थंड हवेची ठिकाणे, तसेच डोंगरी किल्ले यामुळे सह्याद्रीचे आकर्षण वाढत आहे. जलविद्युत-निर्मितीसाठी योग्य जागा व घाटातून जाणारे रस्ते आणि लोहमार्ग यांनी तयार झालेले वाहतूक पट्टे यामुळे देखील आर्थिक द्रुष्टीने हा भाग अधिक आकर्षक बनत आहे. सह्याद्रीच्या पूर्वेला मावळ भागातील जंगलांच्या कडेला वसलेल्या गावांमुळेच मराठ्यांच्या सैन्याला बळ प्राप्त झाले. या भागातील जीवन खडतर पण रांगडे आहे.