व्रतवैकल्ये कालची आणि आजची

व्रते आणि वैकल्ये हा प्रत्येक धर्माचा या सांस्कृतिक जीवनाचा एक महत्त्वाचा अनिवार्य असा भाग असतो. आपल्या भारतीय परंपरेत प्राचीन काळापासून धार्मिक वृत्तांची संख्या वाढत गेलेली दिसेल. एखाद्या विशिष्ट काळासाठी अथवा आमरण आचारायचा एखादा नेमधर्म म्हणजे व्रत होय. ‘वृ’ म्हणजे निवड करणे. आपल्या हेतूस अनुसरून आपणच निवडून घेतलेला नेमधर्म म्हणजे व्रत ‘वृ’ या धातूचा इच्छा करणे असाही अर्थ होतो. आपल्या इअच्छेस अनुरूप असे व्रत आपण निवडायचे असते. व्रियते स्वर्गं व्रतन्ति स्वर्गमनेन वा, ज्यायोगे स्वर्गांची प्रात्प्ती होते ते व्रत अशीही व्रत. या शबदाची व्युत्पत्ती सांगितली जाते. व्रतात उपवास, पूजन, तपाचरण, जपजाप्य, श्रद्धापूर्वक विधी इत्यादींचा समावेश होतो. बहुतेक सर्व व्रते धनधान्य, पुत्र, यश, आरोग्य, विद्या, कीर्ती, वैभव, पुण्य इत्यादींच्या प्राप्तीच्या इएने केलेली, म्हणजेच सकास असतात.

चातुर्मासात, विशेषतः श्रावणभाद्रपदात व्रतांचा सुकाळ दिसतो. पुरुषांपेक्षा बायका व्रतविधीत अधिक गुंतलेल्या दिसतात. मंगळगौरी, नागपंचमी, रक्षाबंधन, जन्माष्टमी, शीतला सप्तमी, हरितालिका, ऋषिपंचमी अशी अनेक व्रतेया दोनचार महिन्यात आजही श्रद्धेने केली जातात. चांगला पती मिळावा व मिळाल्यास तो दीर्घ काळपर्यंत नव्हे तर जन्मोजन्मी लाभावा म्हणून बायकांची व्रते अनेक सांगितली आहेत. पुरुषांपेक्षा बायकांनाच व्रते अधिक का ? या प्रश्नाचे उत्तर हरदासी पद्धतीने देता येण्यासारखे आहे. खडतर व्रताचरण करून मनासारखा पती मिलविणे अवघड. कारण पुरुष जात अविश्वासनीय म्हणून बायकांना व्रतविधी महत्त्वाचे. पुरुषांना व्रतांची, पत्नी मिळणाऱ्या व्रतांची जरुरी नाही. कारण स्त्री ही बहुधा चांगलीच, सुलभ असल्याने व्रते न करताही सहजासहजी मिळण्यासारखी आहे. खरे कारण असे असू शकेल की पुरुषांपेक्षा बायकांन व्रतवैकल्ये करण्यासाठी प्राचीन काळापासून वेळ भरपूर असावा.

व्रतांची संख्या पुराणांनी खूप वाढविली असली तरी बदकाळापासून व्रतांचा उल्लेख येतो. कोणतेही धार्मिक कृत्य करणे म्हणजे एक तपाचरण असते. असत्य बोलू नये, मांस भक्षू नये, अन्नाची निंदा करू नये, अतिथीला भोजनास नाही म्हणू नये, असे साधे व्यवहाराचे नीतिनियम पूर्वी व्रतांतच येत असत. पुढे नाना देव, देवता, उपदेवता यांची निर्मिती व पूजापद्धती निर्माण झाल्यावर पुराणांनी व्रतांची संख्या वाढविली. गणेश, विष्णू, शिव, सूर्य, लक्ष्मी, दत्त इत्यादी देवासंबंधी व्रते विकसित झाली. तिथी, वार, महिना, विशिष्ट योग इत्यादींच्या निमित्ताने व्रते तयार झाली. विशिष्ट अन्नाचे सेवन, झोप घेण्याची पद्धत, मंत्र व पुराणे, नैवेद्य, सांगता कहाण्या इत्यादी सोपस्कारांनी व्रते समृद्ध बनली. इष्टमित्र एकत्र आले, एका विचाराने, निश्चयाने ब्रताचरणात गढून गेले. हौसमौज झाली, नटणे मुरडणे झाले, मिष्टान्नाचा नैवेद्य झाला, करमणूक झाली, असेही व्रतांचे स्वरूप एका बाजूला, तर दिवसच्या दिवस उपवास करून, शृंगाराचा त्याग करून, बोलणे कमी करून, शरीराला कष्ट देऊन खडतर आचरण व्रतांच्या रूपाने दुसऱ्या टोकाला दिसते. संकल्प, पूजा, होम, उपवास,दान, जागरण, श्रवण, वाचन, पारणे, उद्यापन यांनी व्रतांची शोभा वाढते.

कृत्यकल्पतरु, कालविवेक, वृत्तखंड, कृत्यरत्नाकर, निर्णयामृत तत्त्वग्रंथ, कालसार, व्रतार्क, समयमूल, तिथ्यर्क, व्रतोद्यापन, बौगदी, व्रतराज, धर्मसिंधू इत्यादी ग्रथांतून विविध ब्रतांचे सांगोपास वर्णन मिळते. पुराणकारांना व धर्मशास्त्रज्ञांनी जी व्रते लोकांच्या आचारात आणली त्यांची संख्या १६२२ पर्यंत पं. गोपीनाथ कविराजांनी मोजली आहे ? शुष्क तत्त्वचर्चा, तात्त्विक विवेचन यांची जाण सर्वसामान्य माणसास नसते. देवाची वा देवतेची मूर्ती, तिची शोडषोपचारे पूजा, गंध, धूप, दीप नैवेद्य आरास, थाटमाट, यात सामान्य माणसाचे मन रमते. इष्टमित्रांच्यासह त्याचा वेळ या कामात चांगला जातो. व्शिवाय व्रताचरणामुळे मनास एकप्रकारचे वळन लागते. दृढ निश्चयाची सवय होते. काटकपणाची जोपासना होते. आचरणास शिस्त लागते. कायिक, वाचिक, मानसिक ‘व्रतांच्यामुळे एकंदर मानवी जीवनास बलकटी येऊन शिवाय स्वर्ग मोक्ष, पुत्र, कीर्ती, व वैभव, आरोग्य इत्यादींची प्राप्ती होते.

व्रतांची संख्या, त्यांचे प्रकार, त्यांचे विधिविधान यांची वाढ विविध देवदेवता व विविध संकल्प या हेतू यांच्या बरोबरच झाली. गौरी, संकष्टचतुर्थी, एकादशी, प्रदोष अमावास्या, अक्षयतृतीया, नृसिंहजयंती, वटसावित्री, राधाष्टमी, अनन्तव्रत नवरात्र, बिल्बसप्तमी, दीपदान, नरकचतुर्दशी, गोवर्धनपूजा, तुलसीविवाह, माघस्नान, वरदाचतुर्थी, अंगारकचतुर्थी, रथसप्तमी, शिवरात्र, अशी व्रतांची संख्या वाढवावी तेवढी थोडीच आहे. अधिकमास, अक्न्यागत, संक्रांतपर्वणी, प्रायश्चित्तविधी इत्यादींच्या निमित्तानेही व्रतसंख्या वाढली. पाप अथवा रोग बरा करणाऱ्या अनेक व्रतांची भर पडली. वटसावित्री मंगलगौरी, हरितालीका, संकष्टचतुर्थी, ऋषिपंचम, श्रावणी सोमवार, अनन्तपूजा, शिवरात्री इत्यादी लोकप्रिय व्रतांची महती त्यांच्या कथांसह काहण्यांसह वाढत गेली. दिवस, वार, तिथी मास यांची व्रते माणसाच्या मनोकामनेबरोबर वाढली आजकाल पांढरा बुधवार लोकमानसात रुजलेला दिसतो. नाना जप, नाना मंत्र, नाना तंत्र, यांचीही चलती होत आहे असे वाटते. त्वरीत धनलाभ पुत्रसंतती, सत्ताभिलाषा, वशिकरण, गुप्तधनाचा शोध इत्यादींच्या साठीही व्रतांचा उपयोग होत असल्याची समजूत आहे.!

व्रतांचे नवे स्वरूप कसे असावे ? आणखी काही नवे व्रते तयार होताना दिसतात का ? अशा प्रश्नांची उत्तरे शोधताना एक गोष्ट सतत जाणवते, ती ही की काळ झपाट्याने पालटत आहे. मानवी जीवन अधिक गतिमान, अधिक समिश्र होत आहे. भौतिकशास्त्रांच्या अभ्यासाने सृष्टीच्या व्यापारातील कार्यकारणभाव ध्यानात येत आहे. मुलांना देवी का येतात ? भूकंप का होतात ? ग्रह का लागतात ? यांचे शास्त्रीय ज्ञान आज लहान मुलांना झालेले दिसते. गणपतीस दुर्वा वाहिल्याने, मारुतिस शेंदूर फासल्याने, एकादशी हरिजागरक केल्याने संकट टळते का ? मनातील हेतू साध्य होतो का ? पापापासून निवृत्ती मिळते का ? असे प्रश्न नविन पिढी विचारू लागली आहे. व्यवसायाचे नोकरीचे स्वरूप बदले, घरे व कुटुंबे लहान झाली. सतत धावपळ, दगदग, तणाव, अपघात, उत्पात यांनी मानवी जीवन उद्ध्वस्त होत गेले. जुन्या निष्ठा संपल्या जुन्या श्रद्धा कोसळल्या, जुन्या मुल्यांची प्रसंगी विटंबना झाली. वेदधर्माची भोळसट कल्पना दूर होत गेली. युरोपीय, भौतिक शास्त्रांच्या शिक्षणाने जीवनदृष्टिच वेगळी झाली. मिल, स्पेन्सन, रसेल इत्यादी विचारवंतानी नवीन विवेकनिष्ठा, बुद्धिवाद, तर्कप्रणाली इत्यादींची जोपासना केली. आपल्या जुन्या व्रतांची. वैकल्यांची भरपूर थट्टा आगरकरांनी, श्रीपाद कोल्हटकरांनी, वीर सावरकरांनी केली.

जेव्हा मानवी मनाचा, त्याच्या रक्ताच्या गुणधर्माचा, त्याच्या जन्मजात प्रवृत्तीचा अभ्यास वाढला तेव्हा मनुष्य विशेषतः स्त्री स्वभावतःच धर्मशील आहे. श्रद्धावान आहे असे ध्यानात आले. रशियाने चीनने, धर्मास, देवदिकांनी हद्दपार केले तरी चोरवाटांनी देवांना मंदिरांना, श्रद्धांना त्याही देशात बलकट स्थान मिळत गेले. अनेक वर्षे साम्यवादी झंजावातात राहून तिबेटी लोक दलाई लामांची उत्कटतेने वाट पाहताना दिसतात ! भौतिक शास्त्रही आपल्या ( जन्मोजन्मी हाच पती लाभावा असं व्रत घेण्याचे दिवस आता स्त्रियांनी संपवायला हवेत ) ज्ञानाची व विद्येची मर्यादा ओळखून आहेत. नोबेल पारितोषिक विजेत्या डॉ. अलेक्सिस करेल. सारख्या शरीरशास्त्रज्ञास ‘मॅन दि अननोन ’ तपासून पाहावा लागला. त्यालाही मॅन नोन टु दि एक्सपर्ट इज फार फ्रॉम हि रिअल मॅन ’ असा निर्वाळा देण्यात संकोच वाटला नाही. देव, धर्म, श्रद्धा यांचे अतूट नाते मानवी रक्ताशी आहे. ते तोडू म्हणता तुटत नाही.

असे असूनही पूर्वीचीचं व्रते या नव्या काळात तशीच चालू ठेवावीत असे कोण म्हणेल ? करारीपणा, दृढ निश्चय, मनोनिग्रह उपवास इत्यादी चांगले हेतू दूर झाले व केवळ वरवर कर्मकांड, उअप्चार, थाटमाट, थोडा दंभ, ख्याली खुशाली यांची वाढ होऊन व्रतांचा मूळ हेतूच नष्ट झाला. शिवाय साधुसंतांनी सकाम भक्तीची हेतुप्रधान कर्मकांडाची, जटिल व्रतवैकल्यांची थोडीफार थट्टाच केलेली दिसून येईल. पुत्र, धन, वैभव, सत्ता, आरोग्य, इत्यादींच्या हेतूनी केलेली व्रते कमी प्रतीची ठरली. सहेतुकतेने पूजा अर्चा व प्रार्थना कमी दर्जाची ठरली. चार आण्यांची खडीसाखर देवापुढे ठेवून लॉटरीच्या तिकिटाचा नंबर मागणे, स्वर्गकामी होऊन, यशयाग करणे, भौतिक वा व्यावहारिक लाभासाठी व्रते आचरणे; या गोष्टींचा साधुसंतांनी अधिक्षेप केला आहे ‘स्वर्गु नर्कू या वाटाचोरांचिया ’ असे तुकोबाचे वचन आहे. प्रेम, उपासना, भक्ती निहेंतुक असावी, तरच मनाची उन्नती होईल अशी शिकवण मिळतगेली. ‘ऐसी कळवळ्याची जाती । करी लाभावीण प्रीती’ हा निष्काम उपासनेचा आदर्श संतांनी घालून दिला.

देवाच्या, धर्माच्या कल्पनाही बदलत गेल्या. सर्वच पसरून राहिलेल्या चैतन्यतत्त्वास ओळ्खून त्यांची जपणूक करणे हाही एक धर्म बनला. ‘जे जे भेटे भूत । ते ते मानते भगवंत’ अशी धारणा बनली. व्यक्तीचा विकास समाजाच्या विकासाबरोबर अभिप्रेत झाला. दया, क्षमा, शांती जेथे आहे तेथे देवाची वस्ती जाणवू लागली. जे रंजलेले, सांजलेले, दुःखी कष्टी, उपेक्षित, दलित आहेत त्यांना जवल करण्यात, त्याचे अश्रू पुसण्यात, त्यांचे दुःख दूर करण्यात ( दुःखी-कष्टी, उपेक्षित, दलित, आजारी जनतेची सेवा हे व्रत घेण्याचा संकल्प आपल्याला का सोडता येऊ नये ? ) परमेश्वराचे पूजन वाटू लागले. वारसदारांनी टाकून दिलेला वृद्ध रोगी मरताना पाहून त्याच्या डोळ्यांतील गळणारी आसवे पाहून त्यात प्रभू येशूचे प्रेम अनुभवणारी मदर तेरेसा एक मोठी व्रताचरणी स्त्रीच का मानू नये ? दीनदुबळ्यांच्या, कुष्टरोग्यांच्या सेवेत आयुष्य वेचणारी शिवाजीराव पटवर्धनांसारखी, बाबा आमट्यांसारखी थोर माणसांची व्रते नव्या स्वरूपाची असून खडतरपणातही कमी नाहीत. या नव्या व्रतांचा लोभ रतुण पिढीस का लागू नये ! कमलाबाई होस्पेट, अनुताई वाघ यांची सेवा ईश्वरचरणी अर्पित झाल्याचे का मानू नये ? त्यांनी अंगीकारलेल्या व्रतांची महती शब्दांनी कशी वर्णन करावी ?

पूर्वीची सर्व व्रते सकाम होती, स्वतःच्या फायद्याची होती. हेतु प्रधानता हा एक प्रकारचा आंधळेपणाच ‘परंतु या नव्या काळातही एखादा वीर असे म्हणून जातो की, ‘की घेतले व्रत हे आम्ही अंधतेने’ नुसते असे म्हणतच नाही तर त्यानुसार सबंध कुटुंबच्या कुटुंब वरवाद होते; सारे पुरुष, साऱ्या स्त्रिय खडतर वनवास भोगतात, आणि पुन्हा उसळी मारून म्हणतात. ‘ हे काय बंधु असती स्त्री सात आम्ही । त्वस्थंडिलीच दिधले असते बळी मी’ हे हौतात्म्याचे, बलिदानाचे कठीण व्रत कित्येक तरुणांना आकर्षित करणारे ठरले. साक्षरता प्रसार संततिनियमन, रोगनिर्मूलन, दारिद्र्य निवारण, स्वच्छता, अशा अनेक क्षेत्रांत जुना दृढ विश्वास जपून राहील शी नवी व्रते निर्माण होतील. गावाशेजारच्या वडाभोवती बायका पूजेसाठी जमत तेव्हाची गोष्ट वेगळी होती. आता घरोघरी वडांच्या फांद्या ओरबाडून पूजा करून जिवंत वटवृक्ष निष्पर्ण व निर्जीव करण्यात कसला फायदा ? यात कसली पतिनिष्ठा ? ‘बेहिशेबी अशी अशी एवढी मोठी रक्कम आज आणली कोठून ? असा प्रश्न विचारणारी आजची सौभाग्यवती आपल्या पतीस सर्वार्थांनी जीवदान देणारी ठरणार नाही का ?

एखादी इडा स्कडर गरिब स्त्रियांच्या बाळंतपणाची सोय मोठ्या प्रमाणात करते. एखादी मादाम क्युरी खडतर संकटांशी तोंड देऊन दोनदा नोबेल पारितोषिक मिळविते. एखादी जेन गुडॉल ऐन वयात संसारसुखाचा त्यान करून आफ्रिकेच्या घनदाट जंगलात चिंपांझींच्या शोधात आयुष्य घालविते, कोणी पर्वतशिखरांचा वेध घेते, कोणी सागरतळाचा ठाव शोधते, कोणी आदिवासी जमातींना माणुसकी प्राप्त करून देते, कोणी देवदासींना दिशा दाखविते, कोणी बलात्काराचा प्रतिकार करण्यात पुढाकार घेते, कोणी अन्यायाविरुद्ध मोर्चांचे नेतृत्त्व करते. अशा व्यक्तींची आचरणे हीच नवीन व्रते मानायला हवीत. स्त्रियांच्या उघड्यानागड्या देहांचे प्रदर्शन वाङ्मयात, मासिकाच्या कव्हरवर, चित्रपटात, नाटकात केवळ धनासाठी, भोगतृप्तीसाठी आणि तेही कलेच्या बुरख्याखाली करणाऱ्या तथाकथित कलाकोविदांना धडा शिकविणारे एखादे नवे व्रत आजही महिला मंडळे का जोपासत नाहीत ?

स्त्रीची मागणी :- एखाद्या देवीसारखी माझी पूजाही व्हायला नको आहे आणि एखाद्या कृमिकिटकाप्रमाणे मला पायदळीही पडायला नको आहे. मला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून जीवनकलहात झगडायची, अग्निकाष्ठे खायची एकदा परवानगी तर द्या, म्हणजे मग माझी खरी परीक्षा तुम्हाला होईल . – गुरूदेव रवीद्रनाथ टागोर