एक सायंकाळ

एक सायंकाळ घुटमळत राहते माझ्या
डोळ्याच्या मिटलेल्या पापणदारापाशी पुन्हा पुन्हा
ठाऊक नसतो तीला रस्ता उजेडाचा
फिरत राहते माझ्याच घरापाशी पुन्हा पुन्हा

ती माझ्यात इतकी शिरते खोल खोल की
मी तीला वेगळं करू शकत नाही माझ्यातून
मी जेव्हा बोलतो तेंव्हा माझ्या शब्दात ती भरते
एक कंपकापरी व्याकूळ दिवेलागण
मी जेव्हा चालतो तेव्हा ती माझ्या रस्त्यात आड येते

मग मी सोलू लागतो प्रकाशाच्या शेंगा
पण त्यातून अंधाराच्याच बिया निघतात
माझ्या अंगावरून तेंव्हा निथळत असतात
अंधारचे लहान लहान थेंब
मला जेव्हा नको नकोशी थेंब
मला जेव्हा नको नकोशी वाटते सायंकाळ
तेंव्हा तर हमखास येते मनाच्या पारापाशी पुन्हा पुन्हा

This entry was posted in मराठी कविता and tagged , , , , , on by .

About संतोष सेलुकर

सध्या प्रार्थमिक शिक्षक. चार वर्ष सर्व शिक्षा अभियान कार्यक्रमात विषयतज्ञ म्हणून कार्य. कविता संग्रह "दुरचे गाव" प्रकाशित झाला असुन अनेक वृत्तपत्रे मासिके यामधून कविता व ललित लेख प्रसिद्ध. १] राज्यस्तरीय कविता स्पर्धेत प्रथम क्रमांक. २] अखिल भारतिय साहित्य संमेलन नाशिक येथे कविता वाचन - विठ्ठल वाघ यांच्या अध्यक्षतेखाली. ३] जागल प्रतोष्ठाण पेठशिवणी, तेजोमयी प्रतिष्ठाण परभणी, चक्रधर स्वामी वाचनालय पालम यांच्या विविध कार्यक्रमांचे(वाड़मयीन) आयोजन व सहभाग. ४] विविध शैक्षणिक प्रशिक्षणातून तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले.