अबू आझमींचे राज ठाकरे यांना आव्हान

अबू आझमी आणि राज ठाकरे

अबू आझमी आणि राज ठाकरे

समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांनी बुधवारी राज ठाकरे यांना आव्हान दिले की, ‘मानखुर्द, शिवाजीनगर अथवा भिवंडी या दोन विधानसभा मतदारसंघांतून एका तरी पाकिस्तानी किंवा बांगलादेशींच्या मतावर निवडून आल्याचे राज ठाकरे यांनी सिद्ध करुन दाखवल्यास माझ्याकडून त्यांना दोन कोटी रुपये देण्यात येतील. पण आरोप खोटा ठरल्यास राज यांनी राजकारणातून संन्यास घेण्याची तयारी ठेवावी.’

राज यांची राजकारणाची मदार खोटेपणावर आधारित असल्याची टीका आझमी यांनी केली. ते म्हणाले की, ‘गिरगाव चौपाटीवरुन मोर्चा काढण्याची परवानगी नसतानाही राज यांनी कायदा मोडून मोर्चा काढला. यावरुन ते कायदा किती पाळतात हे दिसते. ते माझ्याविषयी काहीही बोलले तरी मी संस्कृतिहीन टीका अजिबात करणार नाही.’

‘रझा अकादमीच्या मोर्चात ज्या माफियांनी मीडिया आणि पोलिसांवर हल्ला केला, त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. ड्रग सप्लाय करणाऱ्यांनी दंगल केल्याच्या जामिया कादरिया अशरफिया स्कूल चालविणारे मोईन मिया यांच्या तक्रारीची चौकशी झाली पाहिजे,’ अशी मागणीही आझमी यांनी केली.