आगर्‍याहून सुटका

मायभूमीला परकीय अक्रमकांच्या विळख्यातून काही अंशी मुक्त करुन, हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या शिवाजी महाराजांचा नि:पात करण्यासाठी औरंगजेबाने मिर्झा राजा जयसिंह याला दक्षिणेत पाठविलं.

त्याच्या प्रचंड सैन्यापुढं महाराज्यांच्या सैन्याला तग धरता येईना. पुरंदर गढ लढविता लढविता मुरारबाजी पडला आणि त्याच्या पाठोपाठ तो गडाही पडला. जयसिंहाचा उत्साह द्विगुणीत झाला. त्याने एका सरदाराकरवी ज्या गडावर महाराजांची आई व बायकामुलं होती त्या सिंहगडाला वेढा घालण्याचा हुकुम सोडला. त्याचबरोबर काही सैन्याला महाराजांचा मुलुख लुटुन बेचिराख करण्याच्या आज्ञा केल्या. महाराजांना प्रजेचे हे हाल बघवेनात. अखेर पोट जाळण्यासाठी स्वकीयांचे राज्ये जिंकून ती परकीयांच्या घशात टाकणाऱ्या मिर्झा राजा जयसिंहापुढं स्वातंत्र्यासाठी जीव गहाण टाकणाऱ्या शिवप्रभूंना शरणागती पत्करावी लागली. मग त्याच्याशी झालेल्या तहानुसार महाराज व त्यांचा पुत्र संभाजी हे पाचसे निवडक मावळ्यांसह आगऱ्याला गेले.

तिथे दिवाण-इ-खास मध्ये भरलेल्या दरबारात महाराज संभाजीसह गेले. दरबारी शिरस्त्याप्रमाणे त्यांनी व संभाजीराजांनी औरंगझेबाला (जुलमाचा) रामरामही ठोकला, पण बादशहाने त्यांच्याकडे साधं ढुंकुनही पाहिला नाही. उलट आसदखान नावाच्या सरदाराने पुढे होऊन महाराजांना व संभाजीराजांना पंचहजारी मनसबदारांच्या रांगेत नेऊन उभे केले !

या अपमानानं संतापित झालेले महाराज, त्यांच्या तैनातीस असलेल्या रामसिंहाला मिर्झा राजा जयसिंहाच्या मुलाला-म्हणाले, ‘या दरबारात फ़क्त भेकडांचाच सन्मान केला जातो काय ? आमच्या तरवारीनं बोटं गमावून बसलेले आणि आमच्याकडून पराभूत होऊन पळून आलेले सरदार इथे सन्मान घेत आहेत आणि आम्हाला या पंचहजारी मनसबदारांच्या रांगेत उभे केले जात आहे ? रामसिंह ! आम्हाला इथे थांबायचं नाही.’ महाराज असं म्हणाले आणि दिल्लीपती औरंगझेबाला बेशक पाठ दाखवून, दरबारातून बाहेर पडले !

वास्तविक ‘तुम्हाला सन्मानाने वागविले जाईल आणि तुमच्याशी कुठल्याही तऱ्हेची दगलबाजी केली जाणार नाही,’ असं वचनं मिर्झाराजानं महाराजांना एकलिंगजी या त्यांच्या देवावरचं बिल्वपत्र उचलून दिलं होतं. तरीही औरंगझेबानं महाराजांना फ़ुलादखानाच्या कडक पहाऱ्यात ठेवलं व तिथून त्यांना अन्य वाईट ठिकाणी हलवण्याचं ठरवलं. पण महाराजांनी औरंगझेबाच्या हातांवर तुरी देण्याचं ठरविलं.
महाराजांनी आजारी पडल्याचं सोंग आणलं. ‘आता आपण फ़ार दिवस जगणार नाही, तेव्हा आपला देहान्त पुण्यक्षेत्री व्हावा, यासाठी काशीस जाण्याची परवानगी आपणास द्यावी.’ असा अर्ज त्यांना बादशहाकडे केला. त्याला अर्थातच नकार मिळाला.

‘मग निदान अखेरचा दानधर्म म्हणून पंडित, मौलवी आदींना मिठाई पाठविण्याची आपल्याला परवानगी द्या’ असा अर्ज महाराजांनी केला. महाराजांची ही निरुपद्रवी मागणी बादशहाने ताबडतोब मान्य केली.

मग महाराजांची काही माणसं बुरुडी पेटारे महाराजांच्या बंदिस्त डेऱ्यात आणू लागली; काही माणसं मिठाई आणू लागली; तर काही माणसं ते पेटारे मिठाईनं भरुन, महाराज सांगतील त्या आग्रा शहरातील व शहराबाहेरील भाग्यवंतांना पोहोचते करु लागली. सुरुवातीला फ़ुलादखान व त्याचे सैनिक पेटारे तपासून पहाऱ्याबाहेर जाऊ देत होते. परंतू हळूहळू ‘प्रत्येक पेटाऱ्यात जर मिठाईच आहे, तर प्रत्येक पेटारा तपासून कशाला पहायला हवा ?’ असं म्हणून पहारेकरी मधूनच एखादा पेटारा उघडून पाहू लागले. ही संधी साधून श्रावण महिन्यातील द्वादशीच्या संध्याकाळी महाराज मिठाईच्या एका पेटाऱ्यात बसले शंभूबाळ दुसऱ्या पेटाऱ्यात बसला आणि ते दोघेही त्या पहाऱ्यातून सहीसलामत बाहेर पडून आग्रा शहराबाहेर गेले.

महाराज निसटल्याचे लक्षात येऊ नये म्हणून, हिरोजी फ़र्जंद महाराजांच्या पलंगावर तोंडावर पांघरुण घेऊन पडला होता, तर मदारे मेहेतर हा ‘महाराजांचे’ पाय दाबीत होता. मध्येच फ़ुलादखानाने डेऱ्यात डोकावून पाहिले, पण तोंडावर पांघरुण घेऊन झोपलेल्या महाराजांचे पाय मदारी मेहतर दाबत असल्याचे पाहून, त्याने तिथून प्रयाण केले तो आता पुन्हा एवढ्यात डोकावायला येणार नाही असे पाहून, महाराज झालेला हिरोजी फ़र्जंद पलंगावरुन उठला; त्याने पलंगावर चिरगुटांच्या महाराजांना झोपवले; त्यांच्या अंगावर पांघरुण टाकले; आणि तो व मदारी मेहेतर नित्याप्रमाणे महाराजांचं औषध आणण्यासाठी पहारेकऱ्यांना सांगून वैद्याकडे गेले, ते तेही कायमचे आगऱ्याबाहेर गेले !

तिकडे आग्रा शहराबाहेर ते दोन पेटारे विशिष्ट स्थळी जाताच, महाराजांची माणसं घोडे घेऊन सज्ज होती. महाराज संन्यासी बनले व शंभुबाळासह आडमार्गानं प्रवास करु लागले. मग महाराजांनी कुणाला शंका येऊ नये म्हणून शंभूबाळाला मागे ठेवलं. यथावकाश पण काही काळाच्या फ़रकानं ते दोघेही स्वराज्यात व स्वत:च्या माणसात सुखरुपपणे पोहोचले. महाराजांच्या या चातुर्याने औरंगझेबाला मात्र मेल्याहून मेल्यासारखे झाले.