अखेर पितळ उघडे पडले

रस्त्यानं जाणाऱ्या एका मोटारसायकलचं चाक हातावरुन गेल्यामुळे, एका मुलाचा हात थोडासा दुखावला. परंतू मोटारसायकलवाला श्रीमंत असल्यामुळे, त्याच्याकडून घवघवती नुकसान भरपाई वसुल करता येईल या अपेक्षेने मुलाच्या बापानं त्या मोटारसायकलवाल्यावर न्यायालयात नुकसान भरपाईचा दावा केला.

मुलाचा वकील : (न्यायमुर्ती) या अपघातामुळे त्या मुलाचा हात त्याच्या खांद्यापर्यंत नेता येत नाही हा दोष आता त्याच्या ठिकाणी त्याच्या आयुष्यभर राहणार असून, त्यामुळे त्याच्या भावी जिवनावर त्याचा अत्यंत वाईट परिणाम होणार आहे, तेव्हा आरोपी मोटारसायकलवाल्याने नुकसान भरपाई म्हणून, या माझ्या मुलाला एक लाख रुपये द्यावे, अशी आमची रास्त मागणी आहे.’

मोटार सायकलवाल्याचा वकील : (मुलास) आता तुझा हात तु किती वर नेऊ शकतोस? या प्रश्नाला उत्तर म्हणून त्याच्या वकीलाने अगोदर पढवून ठेवल्याप्रमाणे आपला हात कसाबसा खांद्यापर्यंत नेऊन दाखविला.

त्यावर आरोपी मोटारसायकलवाल्याच्या वकीलानं पुन्हा प्रश्न केला, ‘बाळ, पुर्वी तूझा हात तू किती वर नेऊ शकत होतास ?’

हा प्रश्न विचारला गेला, तर कसं वागायचं याची कल्पना वकीलानं दिली नसल्याने, त्या मुलाने आपला हात एकदम वर नेला व तो म्हणाला, ‘पूर्वी मी माझा हात एवढा वर नेऊ शकत होतो.’

त्याबरोबर न्यायमुर्ती म्हणाले, ‘या मुलाच्या हाताला फ़ारसा अपाय झालेला नाही. त्याला आपला हात पूर्वीप्रमाणेच वरखाली करता येतो. केवळ अरोपीकडून पैसे उकळण्यासाठी हा खोटा दावा केला असल्याने, मी हा दावा काढून टाकतो.