आळशी तरूण मनुष्य

एका आळशी तरूण मनुष्यास सकाळी दहा वाजेपर्यंत बिछान्यांतच पडून राहण्याची सवय होती. त्यास कोणी एकाने विचारले, ‘अरे, तू सकाळी लवकर का उठत नाहीस ?’ तरुण सांगतो, ‘प्रत्येक दिवशी सकाळी मी पाहतो तो, आलस्य आणि उदयोगिता या नांवाच्या दोन स्त्रिया माझ्या दोन बाजूस उभ्या असलेल्या दृष्टीस पडतात. उदयोगिता मला म्हणते की, ‘अरे, आता ऊठ आणि आपल्या कामास लाग. ’ आलस्य म्हणते की, ‘उठू नकोस, असाच पडून रहा !’ इतकेच सांगून त्या थांबत नाहीत, तर आपापल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ लांब लांब भाषणे करतात व निरनिराळी कारणे सांगू लागतात. दोघींचीही भाषणे, एखादया निष्पक्षपाती न्यायाधीशाप्रमाणे मी ऐकून घेतो तोच जेवणाची वेळ होते व मग त्या वेळी मी उठतो.

तात्पर्य:- आळशी मनुष्य, काम करावे लागू नये म्हणून वाटेल तसली सबब सांगण्यास कमी करीत नाही.