हेडलीच्या चौकशीबाबत प्रश्नचिन्हे

डेव्हिड हेडली

डेव्हिड हेडली

२००८ मध्ये मुंबईत दहशतवादी हल्ला झाला होता व यातील आरोपी डेव्हिड कोलमन हेडली आणि तहव्वूर राणा यांची चौकशी करण्याबाबत बोलण्यास अमेरिकेने पुन्हा नकार व्यक्त केला आहे. बुधवारी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा आणि अमेरिकी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांच्यात चर्चा झाली.

त्यानंतर दोन्ही मंत्र्यांनी पत्रकारांना चर्चेबाबत माहिती दिली. ‘दोन्ही देशांच्या संबंधांबाबत बोलायचे झाले तर दोन्ही देश मिळून युद्धसराव करत आहेत. चर्चेतून ह्या गोष्टी पुढे जात आहेत. उभय देशांतील संरक्षण विषयक व्यापार ८ अब्ज अमेरिकी डॉलरच्या पुढे पाच वर्षांत गेला आहे,’ असे क्लिंटन म्हणाल्या. ‘आमच्या नीतीमध्ये माहितीचे आदान-प्रदान करणे हा ही भाग येतो. तशी माहिती आम्ही देतो. पण अधिक सखोल माहिती मी त्याबाबत देऊ शकणार नाही. पण हे मात्र मी सांगू शकते की उभय देशांचे संबंध नव्या पातळीवर पोहोचले आहेत,’ असे हेडलीच्या चौकशीबाबत क्लिंटन म्हणाल्या.

दरम्यान एस. एम. कृष्णा म्हणाले की, ‘अमेरिकेने भारताला मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हफीझ सईद याच्या तपासाबाबत पुढे काय झाले याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. हफीझच्या नावावर एक कोटी डॉलरचे बक्षीस ओबामा प्रशासनाने जाहीर केले आहे. अमेरिकेने वचन दिले होते की हेडलीची चौकशी करण्यास ते परवानगी देतील पण त्यांनी अद्याप तरी त्याचे पालन केलेले नाही.’