आर के लक्ष्मण यांचा गौरव

आर. के. लक्ष्मण

आर. के. लक्ष्मण

ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचा ‘द आर्ट अ‍ॅंड म्युझिक फाउंडेशन’तर्फे ज्येष्ठ शास्त्रज्ञ के. कस्तुरीरंगन यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

‘लक्ष्मण यांनी मला कधीही पाहिले नव्हते. टेप केलेला आवाज आणि माझा छोटा फोटो पाहून त्यांनी कपाळावरच्या आठ्या काढून माझे ‘परफेक्ट’ व्यंगचित्र रेखाटले होते. या प्रकारे त्यांनी मला आश्चर्यचकीतच करुन टाकले होते. मी जेव्हा इस्त्रोचा अध्यक्ष होतो, त्यावेळेस मला भीती वाटायची की जर आमचा एखादा प्रकल्प फसला तर लक्ष्मण त्यावर कोणते न कोणते व्यंगचित्र काढतीलच. पण व्यंगचित्र कलेला लक्ष्मण यांनी उच्च स्तरावर पोहोचवले आहे. सर्वांना त्यांच्या कलेचे आकर्षण होते’, अशी आठवण सांगून त्यांनी लक्ष्मण यांना गौरविले.

पार्थसारथी म्हणाले की, ‘लक्ष्मण यांनी आपली व्यंगचित्रकला धर्म, प्रांत आणि भाषेच्याही पलिकडे नेली व ‘कॉमन मॅन’ची परिस्थिती त्यांनी आपल्या सुंदर कलेने मांडली. लक्ष्मण हे व्यंगचित्रकलेचे बादशहाच आहेत’.

लक्ष्मण यांच्या पत्नी कमला लक्ष्मण यांनी पुरस्कार महत्त्वाचा असल्याचे सांगत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर डॉ. टिकेकर आणि डॉ. राम तनेजा यांनी ‘टाईम्स ऑफ इंडिया’ मधील आठवणी सांगितल्या.