आंधळ्याची दूरदृष्टी

एका आंधळ्या भिकाऱ्याने देवाची मनोभावे व दीर्घ काळ तपश्चर्या केली. त्याच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन त्याच्यापुढं प्रकट झालेला देव त्याला म्हणाला, ‘तू कोणताही एक वर मजकडे माग.’

तो आंधळा, पण चतुर भिकारी म्हणाला, ‘देवा ! माझ्या नातवाचा राज्याभिषेक समारंभ मला पाहायला मिळावा.’

आपण सांगितल्याप्रमाणे आधंळ्यानं एकच वर मागितला, म्हणून देव त्याला ‘तथाऽस्तु’ म्हणून अंतर्धान पावला, पण त्या वराची परीपुर्ती करण्यासाठी देवाला बरीच यातायात घडली.

अगोदर त्या आंधळ्याला दृष्टी द्यावी लागली. मग त्याचे लग्न करुन द्यावे लागले. त्यानंतर त्याला एका राज्याचा राजा बनवावे लागले. त्याच्या बायकोच्या पोटी मुलगा जन्माला घालावा लागला. त्या मुलाचं लग्न; त्याच्या बायकोच्या पोटी मुलगा पुढं त्या मुलाचं म्हणजे नातवाचं लग्न व राज्याभिषेक ! आणि हे सर्व पाहता यावं, यासाठी त्या मूळच्या आंधळ्या भिकाऱ्याला कमालीचं दीर्घ आयुष्य !