अण्णांचा पंतप्रधानांवर थेट वार

अण्णा हजारे

स्वच्छ व प्रामाणिक चारित्र्य असल्याचा दावा पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंह जर करत असतील, तर ते चौकशीला का सामोरे जात नाहीत. स्वतंत्र चौकशीला त्यांनी सामोरे जाणे गरजेचे आहे. निवृत्त न्यायाधीशांमार्फत त्यांची चोकशी करण्यात यावी, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी असे प्रतिपादन बुधवारी केले.

आपल्यावर लावलेले भ्रष्टाचाराचे आरोप ‘टीम अण्णा’ने सिद्ध केल्यास राजकारण सन्यास घेऊ, अशी घोषणा ‘टीम अण्णा’ने केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे व्यथित झालेल्या पंतप्रधानांनी केली होती. या घोषणेवर प्रतिक्रिया देतांना अण्णांनी त्यांचे हे मत व्यक्त केले. ‘व्यक्तीशः पंतप्रधान भ्रष्ट असतील, असे मला अजिबात वाटत नाही. माझा त्यांच्या प्रामाणिकपणावर विश्वास आहे’, असेही ते म्हणाले. ‘टीम अण्णा’ कडून पंतप्रधानांवर होत असलेल्या आरोपांबाबत ‘टीम अण्णा’चे वरिष्ठ सदस्य न्या. संतोश हेगडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, पंतप्रधानांवर लावलेले भ्रष्टाचाराचे आरोप खोटे असल्याचे सिद्ध झाल्यास आम्हाला आनंदच होईल, असे वक्तव्य ‘टीम अण्णा’चे सदस्य अरविंद केजरीवाल यांनी केले. त्याचबरोबर ‘पंतप्रधानांना नियंत्रिक आणि महालेखापाल या संस्थेचा अहवाल बेजबाबदार वाटतो का’, असेही ते म्हणाले.

नेमका कोणता आरोप?
पंतप्रधानांकडे सन २००६ ते २००९ या काळात खाण मंत्रालयाचा कार्यभार होता. सवलतीच्या दरात अनेक खाण कंपन्यांना त्यावेळी परवाने दिले जात होते. त्यातून १ कोटी ८० लाख रुपयांचे नुकसान सरकार महसूलाचे झाला असल्याचा ठपका कॅगने लावला आहे.

विविध प्रतिक्रिया
“इतर सदस्यांनी पंतप्रधानांवर केलेल्या आरोपांवर विश्वास ठेवणे कठीण आहे, पण चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे कारण तसे सूचित करणारे कागदपत्र अस्तित्वात आहेत”- न्या. संतोष हेगडे

“या प्रकरणातील आरोपपत्राच्या बरोबर असलेली कागदपत्रे पंतप्रधानांनी आमच्या आरोपांना बेजबाबदार ठरवण्यापूर्वी वाचणे गरजेचे होते.”- प्रशांत भूषण

“नक्षली विचारांच्या माथेफिरुंच्या तावडीत टीम अण्णा सापडली आहे. टीम सोडून अण्णांनी आमच्याबरोबर यावे.”- सुब्रम्हण्यम स्वामी