अनुज बिडवे याच्या नावाने स्कॉलरशिप

अनुज बिडवे

अनुज बिडवे

अनुजच्या दुर्दैवी हत्येमुळे इंग्लंडला शिकायला जावं की नाही, या विचाराने विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत. अनुजची ही घटना अपवादात्मक आहे. इंग्लंड हा उच्चशिक्षणासाठी चांगला देश आहे. अनुज याचे वडील सुभाष बिडवे यांनी अनुजच्या नावाने सुरु होत असलेल्या स्कॉलरशिपचा लाभ मराठी विद्यार्थ्यांनी अधिकाधिक घ्यावा, असे आवाहन केले आहे. इंग्लंडमधील विद्यापीठे, समाज, पोलिस यंत्रणा भारतीय विद्यार्थ्यांना सहकार्य करतात, असेही त्यांनी सांगितले.

इंग्लंडच्या लॅंकेस्टर विद्यापीठातर्फे अनुजच्या स्मृत्यर्थ विशेष शिष्यवृत्ती सुरु करण्यात येत आहे. पुणे विद्यापीठाचा इंजिनीअरिंगचा अनुज माजी विद्यार्थी होता. या शिष्यवृत्तीसाठी पुणे विद्यापीठातून इंजिनीअरिंग पूर्ण केलेले विद्यार्थी पात्र ठरणार आहेत, डॉ. वासुदेव गाडे यांनी शुक्रवारी ही घोषणा पत्रकार परिषदेत केली. कुलसचिव डॉ. मा. ल. जाधव, बीसीयूडी संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड, हे सुद्धा यावेळी उपस्थित होते.

डॉ. गाडे म्हणाले की, ‘पुणे विद्यापीठात आणि लॅंकेस्टर विद्यापीठात कोणत्याही प्रकारचा करार झालेला नाही. लॅंकेस्टर विद्यापीठाने स्वतः पुढाकार घेतल्याने ही शिषवृत्ती सुरु होत आहे. जे विद्यार्थी इच्छुक आहेत, ते विद्यार्थी पुणे किंवा लॅकेस्टर विद्यापीठाला ऑनलाईन फॉर्म भरून अर्ज करु शकतात. ही शिष्यवृत्ती पुणे विद्यापीठाशी संलग्न कॉलेजमधून इंजिनीअरिंग पूर्ण केलेल्या एका विद्यार्थ्याला दर वर्षी मिळणार आहे.’

लॅंकेस्टर विद्यापीठातील हा पदव्युत्तर कोर्स एका वर्षाचा आहे व याची आणि निवासाची सोय मिळून २४ लाख रुपयांची ही शिष्यवृत्ती असणार आहे. ३० जून ही शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. www.postgraduate.lancs.ac.uk किंवा www.unipune.in या वेबसाईटवर इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करावा.
सप्टेंबर २०१२ पासून अभ्यासक्रम सुरु होणार आहे.