अरुप पटनाईक यांना प्रमोशन

अरुप पटनाईक

अरुप पटनाईक

११ ऑगस्ट रोजी आझाद मैदान येथे पोलिसांवर झालेल्या हिंसाचार प्रकरणी मुंबईचे पोलिस आयुक्त अरुप पटनाईक यांच्यावर बदलीची कारवाई होण्याची तीव्र शक्यता आहे. जर पटनाईक यांची बदली झाली तर त्याचे श्रेय राज ठाकरे यांना जाईल, त्यामुळे सरकारने हा निर्णय तूर्तास लांबणीवर टाकला आहे.

रझा अकादमीच्या कार्यक्रमानंतर आझाद मैदान येथे हिंसाचार उसळला होता. त्यात पोलिसांवर मोठ्या प्रमाणात मारहाण झाली होती. या घटनेचा निषेध करण्यासाठी तसेच, पटनाईक यांच्यावर कारवाईची मागणी करण्यासाठी राज यांनी मंगळवारी मोर्चा काढला होता. परंतु, सूत्रांकडून कळविण्यात आले की, गृह खात्याने पटनाईक यांच्या बदलीचा प्रस्ताव मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केव्हाच पाठविला आहे पण अजून त्यावर कोणताही निर्णय त्यांनी घेतलेला नाही.

बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक झाली. त्या बैठकीत अजित पवार यांनी पटनाईक यांची बाजू घेतल्याचे समजते.

असे समजते की, पटनाईक यांना तात्पूर्ते अभय मिळाले आहे कारण, मोर्चा काढल्याच्या दबावाखाली जर पोलिस आयुक्तांची बदली केली गेली तर, चुकीचा संदेश जाईल. गृहमंत्री आर. आर. पाटील हे पटनाईक यांना आयुक्तपदावरुन हटविण्यासाठी आग्रही होते पण उपमुख्यमंत्री पवार यांनी त्यांची बाजू घेतल्यामुळे गृहमंत्र्यांचीच गोची झाली आहे. पण पटनाईक यांना ‘प्रमोशन’ मिळाल्यामुळे मनसेचा मोर्चा त्यांच्यासाठी इष्टापत्ती ठरला आहे.